सेवा रस्ते खड्डेमुक्त; पाच वर्षे चिंता नाही!

स्टोन मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाने दुरुस्ती

ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील काही सेवा रस्ते स्टोन मास्टीक अस्फाल्ट तंत्रज्ञानाने दुरुस्त करण्यात आले असून पाच वर्षे हे रस्ते खड्डेमुक्त राहतील, असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात घोडबंदर पट्ट्यातील उड्डाणपूल हे एमएमआरडीएच्या अखत्यारीत येत असले तरी, दोन्ही बाजूचे सेवा रस्ते हे ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने या सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे. पावसाळ्यात किमान सेवा रस्त्यांवर खड्डे पडू नयेत आणि ठाणेकरांचा प्रवास खड्डेमुक्त व्हावा यासाठी ठाणे महापालिकेचे प्रयत्न असून यासाठीच पालिका क्षेत्रातील चार रस्त्यांची दुरुस्ती ही स्टोन मास्टिक अस्फाल्ट या नव्या तंत्रज्ञानाने करण्यात आली आहे.

कॅडबरी जंक्शन ते गोल्डन डाईज नाका, नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन, कोपरी ब्रिज ते तीन हात नाका आणि शीळ दिवा रस्त्यावर स्टोन मास्टीक अस्फाल्ट पद्ध्तीने दुरुस्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला स्टोन मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर हा विवियाना मॉल येथील सेवा रस्त्यांसाठी करण्यात आला होता. या रस्त्यावर हे तंत्रज्ञान यशस्वी झाले होते. त्यामुळे आता या चारही सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामुळे या सेवा रस्त्यांचे आयुर्मान पाच वर्षांपर्यंत असणार आहे तसेच पाच वर्ष या सेवा रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

या पद्ध्तीनुसार सर्वात वरच्या थराला अस्फाल्ट काँक्रीटचा थर दिला जातो, जो सर्वाधिक टिकाऊ थर असतो. यावर डांबराचा देखील थर असतो. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे रस्ते टिकाऊ होत असून इतर तंत्रज्ञानाच्या तुलनेत या तंत्रज्ञानाचा खर्च २५ टक्के जास्त असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली होती. यानंतर स्वतः एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी केली होती. यामध्ये दोन अभियंत्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र यावेळी महापालिकेने वेळेआधीच सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असल्याने प्रशासनावर होणारी संभाव्य टीका टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन, कॅडबरी जंक्शन ते गोल्डन डाइज नाका, कोपरी ब्रीज ते तीन हात नाका, शीळ दिवा रस्ता येथे स्टोन मास्टीक अस्फाल्ट पद्धतीने दुरुस्ती करण्यात आली आहे. शीळ दिवा रस्ता वगळून तीन रस्त्यांसाठी सात कोटींचा खर्च करण्यात आला आहे.