बदलापूर पालिकेकडून ५२ मालमत्तांवर जप्ती

बदलापूरः थकीत मालमत्ता कराची वसूली करण्यासाठी बदलापूर नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून मंगळवारी ५२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाच भरारी पथकांची स्थापना केली असून त्यांच्याकडून ३६ लाखांची वसूली करण्यात आली.

बदलापूर नगरपालिका क्षेत्रात एक लाख २३,२७३ रहिवासी तर १४,३६५ वाणिज्य आणि ६४२ औद्योगिक अशा एकूण एक लाख ३८,२८० मालमत्ताधारक आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षातील एकूण मागणी रक्कम ८१.८४ कोटी इतकी आहे. त्यापैकी नगरपरिषदेने जवळपास ५७.५९ कोटी इतकी वसुली केली आहे. अजूनही २४.२५ कोटी इतकी थकबाकी नगर पालिकेला येणे बाकी असून ते वसूल करण्याकरिता विशेष वसुली मोहीम सोमवार १० मार्चपासून मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी सुरू केली. यासाठी पाच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती. या पथकांमार्फत थकीत मालमत्ता करधारकांच्या मालमत्ता जप्त करणे तसेच अटकावणी करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

सोमवारी भरारी पथकांनी ५२ मालमत्तांची जप्ती केली असून त्याचा थकीत मालमत्ता कर ६४ लाख १४ हजार इतका आहे. तसेच थकीत मालमता कराची भरारी पथकाद्वारे ३६ लाख ५१ हजार इतकी वसुली करण्यात आली आहे. कुळगाव-बदलापूर नगर पालिकेच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता कर जमा करून नगर पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.