कला-सुरांनी बहरणार संस्कृती आर्ट फेस्टिवल

लोककलाकर मैथिली ठाकूर लावणार हजेरी

ठाणे : लोककलाकार मैथिली ठाकूर ही पहिल्यांदाच महाराष्ट्रात आपली कला सादर करणार असून ती संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे खास आकर्षण असणार आहे.

प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल २६ ते २९ जानेवारी दरम्यान उपवन तलाव येथे होणार असून यंदाचे हे सातवे वर्ष आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही यावर्षीची संकल्पना आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाला एक हजारपेक्षा जास्त शाळकरी मुले उपस्थित राहणार असून चार दिवसात ६०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होणार आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून भजन आणि अन्य भाषेतील लोकगीते आपल्या दोन लहान भावांच्या मदतीने सादर करणारी मैथिली ठाकूर ही राज्यात पहिल्यांदाच आपली कला उपवन फेस्टिव्हलमध्ये सादर करणार असल्याचे आमदार सरनाईक म्हणाले. त्याचबरोबर उदीत नारायण, इंडियन आयडॉल १२ चा पवनदीप राजन, डॉ. जसबीर नुरूला हे देखील आपली कला मुख्य मंचावर सादर करणार असल्याचे आमदार सरनाईक म्हणाले.

या महोत्सवात हँडीक्राफ्टचे स्टॉल्स आणि विविध प्रकारचे फूड स्टॉल असल्यामुळे खवय्यांना मनसोक्त आनंद घेता येईल. लाईट आणि लेझर शो, आर्ट-क्राफ्ट वर्कशॉप, एडवेंचर स्पोर्ट्स, आणि विनाशुल्क प्रवेश ही महोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत.

तरंगणाऱ्या मंचावर सगुण निर्गुण विदुषी कलापिनी कोमकली, सावनी शेंडे, पंडित भीमना जाधव, पंडित अनिदो चॅटर्जी, दीपिका भिडे-भागवत, सारंगी वेदक, संगीत मिश्रा, लिओडेल ऑस्ट्रेलिया हे कला सादर करणार आहेत.