सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरण; विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती

ठाणे: ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी जलदगती न्यायालयात अॅड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेच्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर दिनांक ३० ऑगस्ट, २०२१ रोजी फेरीवाल्याकडून चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी जलदगती न्यायालय स्थापन करणे व विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करणे याबाबत ठाणे महापालिकेच्यावतीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जलदगती न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालयास शासन पत्रान्वये पाठविण्यात आला आहे. सदर प्रकरणी शासनाच्या अधिसूचनेनुसार अॅड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.