ठाण्यात मेट्रोची लगीनघाई; ओवळ्यात स्थानकाची तयारी

कासारवडवली-गायमुख मेट्रो 4 ए चे काम प्रगतीपथावर

ठाणे : कासारवडवली-गायमुख मेट्रो 4 ए चे काम प्रगतीपथावर असताना गोवनीपाडा (ओवळा) या पहिल्या स्थानक उभारणीचेही काम सुरु झाले आहे. येथे स्थानकासाठी खांब उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या स्थानकाचे अंदाजे 70 टक्के काम पूर्ण झाल्याचे कळते.

कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो लाईन ‘4 ए’चे काम विस्तारित मेट्रो लाईन 4’ चा एक भाग आहे. त्याचेही काम प्रगतीपथावर आहे. गोवनीवाडा स्थानक ग्रीड क्र. २ साठी कॉन्कोर्स पिअर आर्म अंतर्गत पहिल्या स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. मालवणी कास्टिंग यार्डमध्ये एकूण 24 सीपीसी कास्टिंग करण्यात आले आहे आणि आणखी 2 ‘कॉन्कोर्स पिअर आर्म’ काम सुरु असलेल्या स्थळावर नेण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी हे दोन ‘सीपीसी’ रात्री उभारले जाणार आहेत.

याशिवाय तीन हातनाका मेट्रो स्टेशन हे मेट्रो लाईन 4 वर आकारास येत आहे. यासंबंधीचे सर्व 101  ‘प्रीकास्ट एलिमेंट्स कॉन्कोर्स लेव्हल’वर उभारण्यात आले आहेत आणि स्थानकाच्या स्लॅबचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. तीन हात नाका बांधकाम सर्व मेट्रो लाईन 4 स्थानकांमध्ये आघाडीवर आहे.

‘एमएमआरडीए’ने कॅच-अप प्लॅननुसार सर्व मेट्रो मार्गावरील कामाला गती दिली आहे. मेट्रो लाईन-4 अ आणि मेट्रो लाईन – 4 ची एकूण भौतिक प्रगती अंदाजे 43 टक्के झाली आहे. सर्व मेट्रो लाईन पूर्णत: कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकल्पाचे टप्पे कोणत्याही अडचणीविना सुरळीत पार पडतील, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी दिली.