अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील सिमेंट रस्त्यावरील स्वच्छता करण्यासाठी आणलेली विजेवर चालणारी चार आधुनिक यंत्रे सज्ज झाली आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला यंत्राद्वारे सफाई सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
माझी वसुंधरा स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत मार्गदर्शक तत्वानुसार तसेच 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार हवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य आणि अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील रोजच्या सफाईसाठी पूर्व भागासाठी दोन आणि पश्चिमेकडे दोन अशी चार आधुनिक स्वीपिंग यंत्रे नगरपालिकेच्या ताफ्यात सप्टेंबर २०२२ मध्ये दाखल झाली होती. मशीन चालवण्याबाबतचे प्रशिक्षण पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. चार स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली आरोग्य खात्याचे मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील रस्ते सफाई होणार आहे.
रस्ते स्वच्छता करणारी यंत्रे विद्युत सेवेवर चालणारी असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. रस्ता सफाई करताना जमा होणारा कचरा आणि माती उघड्यावर न टाकता यंत्रामधील प्लास्टिक बॅगमधून प्रभागातील घंटागाडीत जमा केली जाणार आहे. विजेवर चालणारी यंत्रे असल्याने त्यांना दर आठ तासांनी कराव्या लागणाऱ्या चार्जिंगसाठी पूर्व आणि पश्चिम भागात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यंत्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक जागी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.