गणवेशाविना रिक्षाचालक; पोचला थेट तुरुंगात!

ठाणे : गणवेशाविना रिक्षा चालवत असताना एका वाहतूक पोलिसाने रिक्षाचालकास हटकले. चौकशी केली असता रिक्षा चोरीस गेल्याची माहिती मूळ मालकाकडून मिळाली. त्यामुळे या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे.

डोंबिवली वाहतूक उपविभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत कदम, पोलीस हवालदार शशिकांत गांगुर्डे, पोलीस नाईक गणेश कोळी हे रामनगर येथे वाहतूक कारवाई करीत असताना एक रिक्षा ‘क्र.एमएच०५सीजी’ चे वरील चालक विनागणवेश रिक्षा चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस हवालदार गांगुर्डे यांनी ‘ए चलन’ मशीनद्वारे रिक्षाचा मूळ मालक कोण आहे याबाबत माहिती मिळवली. रिक्षाचा मालक प्रसाद माळी यांच्याशी संपर्क केला असता संबंधित रिक्षा ही 18 ऑगस्ट 2024 रोजीपासून बदलापूर येथून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी खात्री करून तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बलवाडकर, बदलापूर (पूर्व) पोलीस ठाणे यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार, गुन्ह्याचे तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील (नेमणूक) बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या ताब्यातील संबंधित चोरीस गेलेली रिक्षा आणि रिक्षाचालक यांना ताब्यात देण्यात आले आहे. संशयित व्यक्तीचे नाव राजेंद्र जाधव असून (42), कोळेगाव डोंबिवली पूर्व या ठिकाणी राहतो. संशयित याच्याविरुद्ध यापूर्वी डोंबिवली पोलीस स्टेशन येथे चार गुन्हे दाखल आहेत.