* २०१६पासून ३५० कोटी थकीत
* टीएमटी कर्मचाऱ्यांच्या पत्नी ठामपा मुख्यालयावर धडकल्या
ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे ३५० कोटीहून अधिक थकीत देणी असून अनेक आंदोलने, पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. दरम्यान काही कर्मचाऱ्यांचे निधनही झाले. अखेर आता या कर्मचाऱ्यांच्या पत्नी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी आज घोषणा देत ठामपा मुख्यालय गाठले. पालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशाराही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) सेवेतून २०१६ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी थकीत असून शासन दरबारी हा प्रश्न प्रलंबित आहे. हे कर्मचारी परिवहन सेवेमध्ये कायमस्वरूपी कामावर होते. ३० ते ३५ वर्षे सेवा बजावून त्यांनी परिवहन सेवेतून निवृत्ती घेतली. महागाई भत्ता, सहावा वेतन आयोग यांसारख्या विविध भत्त्यांचा या थकीत रकमेत समावेश असून ती ३५० कोटींच्या घरात आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांपैकी १६०हून अधिक कर्मचारी निवृत्ती वेतनाची वाट बघत मरण पावले आहेत. त्यांच्या मरणानंतर देखील त्यांच्या कुटुंबांना हक्काचा भत्ता किंवा निवृत्ती वेतन मिळालेले नाही. अनेक कर्मचाऱ्यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. एकीकडे आजारपणाचा खर्च आणि दुसरीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह यामुळे निवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मेटाकुटीला आले आहेत.
वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील त्यांची थकीत देणी अदा न केल्यामुळे सर्व निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या पत्नींनी परिवहन व्यवस्थापकांची भेट घेतल्यानंतर ठामपा मुख्यालयावर धडक दिली. आयुक्तांना निवेदन सादर करून लवकरात लवकर थकित देणी एक रक्कमी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.