नवी मुंबई : नियोजनबद्ध शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईच्या नागरी सुविधांमध्ये लवकरच बदल दिसून येतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास खा. म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असले तरी येथील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास, सिडको आणि नवी मुंबई महापलिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत सर्वसमावेशक चर्चा होऊन सर्व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आले.
नवी मुंबई हे एक सुंदर आणि नियोजनबद्ध शहर असले तरी काही भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या कायम आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन खा. म्हस्के यांनी नवी मुंबईकरांना दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असिम गुप्ता, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे संचालक गणेश देशमुख, संचालक दयानिधी राजा तसेच तिनही खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कंडोमिनियम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या 70 टक्के भागामध्ये येथील रहिवासी राहतात. सिडकोने बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. या भागांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा, रस्त्यावरील दिवे अशा अनेक सुविधा वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. कारण या भागात जमिनी सिडकोच्या मालकीच्या असून महापालिकेने नागरी सुविधा देण्याची कामे 2011 पासून बंद केली आहेत. सिडकोने ही घरे दिली, पण महापालिकेने त्यांना आवश्यक सुविधा देणे बंद केले. या वस्त्यांमध्ये कोणतीही नागरी कामे झाली नव्हती. या बैठकीत महापालिकेने मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात, मल:निसारण (ड्रेनेज) आणि पाणीपुरवठा यासंबंधीची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी महापालिकेला दिले. रस्त्यावरील पथदिवे, रस्ते आणि इतर सुविधांसाठीही शासनाकडून लवकरच मान्यता देण्यात देईल, असे यावेळी सांगण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिडकोने बांधलेल्या एलआयजी, एमआयजी, बीयूडीपी कंडोनियम या अल्प उत्पन्न गटाच्या घरांमध्ये गरजेपोटी काही ठिकाणी अधिक बांधकाम झाले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्या घरांना अनधिकृत ठरवत कोर्टाच्या आदेशानुसार नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेतून हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, कोर्टाने दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीत वाढ मागून नागरिकांना दिलासा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खा. नरेश म्हस्के यांनी दिली.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा अंतिम निर्णय शिवसेनेच्या प्रयत्नांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी घेतला. या सर्वेक्षण संदर्भात सिडको अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांना विश्वासात घेऊन सर्वे करावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
शिवसेना उपनेते विजय नहाटा, विजय चौगुले, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीतलताई कचरे, सरोज पाटील, दमयंती आचरे, शहर प्रमुख विजय माने, मनोज हळदणकर, माजी नगरसेवक रोहिदास पाटील, सुरेश कुलकर्णी, रमाकांत म्हात्रे, शिवराम पाटील, सुरेश सकपाळ, प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर सुतार, रवींद्र पाटील, विजयानंद माने, सोमनाथ वासकर, रंगनाथ आवटी, दिव्या गायकवाड, वैभव गायकवाड, अंकुश सोनवणे, अविनाश लाड, दिलीप घोडेकर, रमेश शिंदे, जितेंद्र कांबळी, नवनाथ चव्हाण, गजानन काळे, सचिन कदम, विकास भोणे, अभिजीत देसाई, डॉ. नितीन तिघे, संदीप यादव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, साईनाथ वाघमारे, महेश कुलकर्णी, भावेश पाटील, राजू पाटील, जगदीश गवते, साहिल चौगुले, रतन मांडवे, रेवेंद्र पाटील, सुरेश सकपाळ, गगनदीप कोहली इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नवी मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असिम गुप्ता, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे संचालक गणेश देशमुख, संचालक दयानिधी राजा यांना पुष्पगुच्छ देऊन नवी मुंबईकरांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले.
ही बैठक म्हणजे नवी मुंबईच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्रिय पुढाकारामुळे आणि आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. आता लवकरच नवी मुंबईच्या नागरी सुविधांमध्ये बदल दिसून येईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.