तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे आणि डबक्यांचे शहर करा

मा.खा. राजन विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर धरले

ठाणे : तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे आणि डबक्यांचे शहर असे नामकरण करा असा टोला शिवसेना (उबाठा )पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना लगावला.

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत राजन विचारे यांनी आज पहिल्या टप्प्यातील ठाणे शहराचा दौरा केला. यावेळी नाले, रस्ते आणि तलावांची दुरावस्था पाहून विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

पावसाळ्यापूर्वी झालेली नालेसफाई व तलावांच्या दुरावस्थेबाबत राजन विचारे यांनी दोन दिवसांपूर्वीच पोलखोल केली. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात मासुंदा तलाव येथून करण्यात आली. यामध्ये तलावाच्या आउटलेटची कामे निधी अभावी अपूर्ण स्थितीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पावसाचे पाणी बाजारपेठेत जाऊन दरवर्षी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली. तसेच वंदना डेपो येथील पारस सोसायटी समोरील नाला कचऱ्याने तुंडूब भरलेला दाखवत ठेकेदार कशी हात की सफाई करतो याचे उदाहरण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दाखवून दिले. या पाहणी दौऱ्यात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, भगवान शिंदे, वैभव तपकिरी,चंद्रकांत सावंत, स्वच्छता निरीक्षक अधिकारी व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कचराळी तलाव येथे इरिगेशन पंप बंद अवस्थेत आहेत, तेथे गावात कसे तयार होते याचे उदाहरण त्यांनी दाखवून दिले. त्यावेळी शिवसेना नेते राजन विचारे अधिकाऱ्यांवर चांगलेच घसरले. ठाणे शहर लेक सिटी नसून डबक्यांची सिटी म्हणून बोर्ड लावा असे अधिकाऱ्यांना त्यांनी ठणकावून सांगितले.

सिद्धेश्वर तलाव परिसरातील रूपादेवी पाडा येथील नाल्यातील साठलेला कचरा निदर्शनास आणून देऊन ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची पाहणी केली. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनावरील अंकुश सुटल्यामुळे आपल्या मनाप्रमाणे अधिकारी कामे करीत आहेत. सिद्धेश्वर तलावात यापूर्वी अशी परिस्थिती कधीच आली नव्हती. त्यावेळी अधिकाऱ्यांना ही कामे वेळेत पूर्ण करा नाहीतर आंदोलन करावे लागेल असा थेट इशारा दिला आहे.