नीळकंठ हाइट्स सोसायटीच्या ७०० सदनिकाधारकांना दिलासा

ठाणे : ठाणेस्थित नीळकंठ हाइट्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज असोसिएशनला अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याचे आदेश सक्षम अधिकाऱ्यांना देताना उच्च न्यायालयाने असोसिएशनच्या ७०० सदनिकाधारकाना दिलासा दिला. त्याचवेळी, मालमत्तेचे हक्क सोसायटीला देण्यात विलंब करणाऱ्या विकासक कंपनीवर ताशेरे ओढले.

सोसायटीच्या जागेची मालकी मिळवण्यासाठी गेल्या दशकभरापासून सोसायटीच्या सदस्यांचा लढा सुरू होता. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्याच्या (मोफा) कलम ११(३) अंतर्गत सोसायटीला अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याचे आदेश सक्षम अधिकाऱ्यांना दिले. तसेच, विकासकाचा विरोध हा सदनिका खरेदीदारांच्या वैधानिक हक्कांचे आणि सोसायटीच्या स्थापनेपासून चार महिन्यांच्या आत अभिहस्तांतरण अंमलात आणण्याच्या मोफा कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन असल्याची टिप्प्णी न्यायालयाने केली.

रामेश्वर (२००४), मानसरोवर (२००५) आणि गिरिजा (२०११) या तीन नोंदणीकृत सोसायटींचा समावेश असलेल्या असोसिएशनने माजीवाडा येथील जमिनीवरील भाडेपट्टा हक्कांच्या मानद हस्तांतरणासाठी अर्ज दाखल केला होता. विकासक कंपनीने एकूण ७४० सदनिका आणि २९ दुकाने बांधली होती, परंतु, जवळपास दोन दशकांनंतरही हस्तांतरण करार अंमलात आणला नाही. तथापि, सोसायटीचा टप्प्याटप्प्याने होत असलेला विकास, दिवाणी खटल्यातील यथास्थिती आदेश आणि असोसिएशनने जास्त जमीन मागितल्याचा आरोपांचा दाखला देऊन सक्षम अधिकाऱ्यांनी असोसिएशनचा अर्ज फेटाळला.

जमीन क्षेत्राच्या वादाबाबात न्यायालयाने असोसिएशनच्या वास्तुविशारदाने मंजूर केलेल्या आराखड्यांवर आधारित केलेली गणना स्वीकारली. तसेच, असोसिएशनने देयतेपेक्षा जास्त जमीन मागितल्याचा विकासकाचा दावा फेटाळून लावला. त्याचवेळी, असे कोणतेही वाद स्वतंत्र दिवाणी कार्यवाहीद्वारे सोडवता येतील असेही न्यायालयाने म्हटले. अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याच्या आदेशाचा दिवाणी न्यायालयातील विकासकाच्या दाव्यावक पपिणाम होणार नाही हेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.