मंगळवारी बाजारात ४७९ हापूस पेट्या दाखल
नवी मुंबई : वाशीच्या एपीएमसी बाजारात हंगामपूर्व हाफुस आंब्याची वावक वाढण्यास सुरुवात झाली असून सोमवारी देवगडमधील ३५० पेट्या दाखल झाल्या नंतर लगोलग मंगळवारी ४७९ पेट्या दाखल झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातील ही विक्रमी आवक झाली असल्याची माहिती फळ व्यापारी व संचालक संजय पानसरे यांनी दिली. या आंब्याला पेटीमागे चार ते आठ हजार दर मिळत आहे.
कोकणात डिसेंबर महिन्यात हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर येतो. मार्च महिन्यात आंबे काढणीला येतात. त्यामुळे मार्च ते मे असा दोन महिने हापूसचा मुख्य हंगाम असतो व या दरम्यान लाखो पेट्या बाजारात दाखल होतात. मात्र यंदा फेब्रुवारीमध्येच हंगाम पूर्व हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात १२५ पेट्या दाखल झाल्यानंतर सोमवार १३ फेब्रुवारी रोजी ३५० पेट्या तर मंगळवारी यात वाढ होऊन ४७९ पेट्या दाखल झाल्या आहेत. मात्र हंगामपूर्व कोकणातून फेब्रुवारी महिन्यात दाखल होणारी आवक ही आजवरची विक्रमी आवक असून चार डझन पेटीला ४ ते ८ हजार दर मिळत आहे, अशी माहिती फळ व्यापारी व संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे. हंगामपूर्व हाफुस बाजारात दाखल होत असल्याने हाफुस प्रेमींची पावले देखील बाजाराकडे वळू लागली आहेत.