सकाळी पावसाचा शिडकावा; दुपारी उन्हाची लाही लाही

रस्त्यांवर शुकशुकाट; संमिश्र वातावरणाने आजारात वाढ

ठाणे : मागील काही दिवस काही अंशी कमी झालेले तापमान आज अचानक वाढले. त्या आधी सकाळी पावसाचा थोडा शिडकावा झाला. त्यामुळे वातावरणात आणखी उकाडा वाढला. आज ४४ अंशाच्या वर तापमान गेल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसला तर संमिश्र वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम दिसून आला.

दुपारी शहरातील पारा ४४.२वर गेल्याने अंगाची लाही लाही होऊन घामाच्या धारा लागल्या होत्या. उष्ण वाऱ्यामुळे ठाणेकरांनी घरातच राहणे पसंद केले त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४५ अंशावर गेले होते. महापालिका हद्दीतील इतिहासात प्रथमच एवढे तापमान झाले होते. त्यानंतर मागील आठवड्यात पारा थोडा खाली आला होता. ३८ ते ३९ अंशावर तापमान स्थिरावले होते, मात्र आज दुपारी अडीच वाजता तापमान ४४.२ अंशावर गेले होते. दुपारी ३.३० वाजता हे तापमान ४४.१अंश झाले होते. साडेचार वाजता तापमान ४३.३ झाले होते. सकाळी हे तापमान ३३.९ इतके होते. त्यावेळी ठाण्यात काही ठिकाणी अचानक पावसाचा शिडकावाही झाला.

हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा आणि उष्ण हवेच्या लहरी बाबत अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार शहरात हवेच्या उष्ण लहरी वाहत आहेत तर सकाळी शहरात थोडा थोडा पाऊस पडला होता त्यामुळे हे तापमान वाढले असावे असे हवामान खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले

शहरातील तापमान वाढल्याने वातानुकूलित यंत्रे आणि वॉटर कुलरचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे सरकारी तसेच खाजगी कार्यालय आणि घरातील वातानुकूलित यंत्राची गती वाढविण्यात अली तर गरम हवेचा त्रास होऊ नये म्हणून अनेकांनी घरातच राहणे पसंत केले त्यामुळे ठाण्यातील बाजारपेठेत शुकशुकाट होता रस्त्यावरील नागरिकांची गर्दी अतिशय कमी झाली होती