लग्नासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खंडापे-चिंचवली या गावातील दोन सख्खे भाऊ नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी दुचाकीने जात असताना त्यांना मागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघा भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वारेट गावाच्या हद्दीत घडली.

पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील (रा. खांडपे- चिंचवली) अशी अपघातात दुर्दैवी मयत झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. या दुर्दैवी अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दोघा भावांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघात प्रकरणी कार चालकाच्या विरोधात गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास भिवंडी-वाडा मार्गावर भिवंडीहून अंबाडीकडे जाणाऱ्या कार (क्र.एम एच ०४ के डब्ल्यू १७४६) वरील चालकाने कार भरधाव वेगात चालवून प्रथम दुगाड फाटा येथे एका महिलेला जोरात धडक दिली. त्या भीतीने पळून जाण्यासाठी त्या कार चालकाने आणखी वेगात कार पळवली. दरम्यान भिवंडीहून दुचाकीवरून दिघाशी येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी निघालेल्या दोघा भावांच्या दुचाकीला वारेट या ठिकाणी जोरदार ठोकर दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कार चालक जखमी झाला आहे.

कार चालकावर भिवंडीतील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी दोघा भावांचे मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघाताची नोंद गणेशपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास गणेशपुरी पोलिस करीत आहेत.