ठाणे: निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेले ठाणे जिल्ह्यातील ३२ हजार अधिकारी,कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणे शक्य नसल्याने निवडणूकीच्या कामावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील अधिकारी आणि कर्मचारी टपालाच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
ठाणे जिल्हयामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची संख्या सुमारे ३२ हजार असून यामध्ये पोलिसांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेव्दारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाकडील सुचनेनुसार निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी आणि कर्मचारी, तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना पोस्टाने मतपत्रिका न पाठविता पोस्टल फॅसिलिटेशन सेंटर तसेच पोस्टल वोटिंग सेंटर मध्ये मतदान करुन घेता येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर फॉर्म १२ व फॉर्म १२ डी प्राप्त होणार असून प्राप्त झालेले फॉर्म सर्व १३ लोकसभा मतदार संघ व त्या अंतर्गत विधानसभा मतदार संघनिहाय वर्गीकरण करुन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापर्यंत पोहचवले जाणार आहे.
या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने १८ एप्रिल रोजी वरील सर्व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन टपाली मतपत्रिकेचे प्राप्त झालेले नमूना १२ व १२ डी एकमेकांना हस्तांतरीत केले आहेत. सदर हस्तांतरानंतर ठाणे जिल्ह्याला नमुना १२ चे एकूण ४३०१ व नमूना १२१ चे ३१० अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकाचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. तसेच अजूनही सर्व वरील मतदारसंघाकडे नमूना अर्ज १२ व १२ डी प्राप्त होणार असून त्यांचेही हस्तातंरण ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर होणार आहे. अद्याप बऱ्याच कर्मचा-यांचे टपाली मतपत्रिकेचे अर्ज येणे बाकी आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना निवडणूकीचे काम त्यांच्या मतदार संघामध्येच मिळणार आहे असे कर्मचारी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचा वापर करून आपल्या पोलिंग बूथवर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.