अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून गळचेपी – नरेश म्हस्के
ठाणे : शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना पदाधिकाऱ्यांचे समर्थनही वाढत आहे. आज ठाण्याचे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना संपूर्ण कार्यकारिणीसह पाठिंबा दिला. शिंदे यांना पाठिंबा देणारा राज्यातील हा पहिला राजीनामा असल्याचे बोलले जाते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन दर्शवले होते. शिंदे यांना पाठिंबा देणारे अनेक बॅनर्स देखील ठाण्यात लागले आहेत. त्यानंतर म्हस्के यांनी देखील फेसबुकवर पोस्ट टाकून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता, मात्र एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना विरोधात एकनाथ शिंदे यांचा असा संघर्ष निर्माण झाल्याने शिंदे यांच्या निवासस्थानी देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशिरा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असल्याने ठाण्यातही वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
जात, गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना असून आम्ही शिवसैनिकच राहणार असल्याचे म्हस्के यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे. अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यानंतर नरेश म्हस्के यांना शिवसेनेत महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रवादीशी युती न करता एकटे निवडणूक लढवण्याची भूमिका सुरुवातीपासूनच म्हस्के यांची होती. त्यामुळे आता म्हस्के यांच्या राजीनाम्याने ठाण्यात वातावरण आणखी तापले आहे.