१७३ मद्यपींसह २७४३ जणांवर कारवाई
ठाणे: ठाण्यात होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांच्या वाहतुक शाखेने ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात केलेल्या कारवाईत तळीराम चालकांचा रंग उतरवला.
पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात १७३ मद्यपींसह एकुण २७४३ जणांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक विभागातील ७०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात केले होते. होळी-धूलिवंदनात मद्य किंवा नशा करून वाहन चालविणार्या चालकांवर कारवाई करण्याची व्यूहरचना वाहतूक विभागाने केली होती.
पाच परिमंडळात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. या नाकाबंदीत नशापान किंवा मद्यप्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्या तब्बल १७३ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर १,५४२ विनाहेल्मेट,६६३ ट्रीपल सीट तर ३६५ रिक्षामध्ये फ्रंट सीट अशा विविध वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकुण २ हजार ७४३ जणांवर वाहतूक विभागाने कारवाई केल्याची माहिती पोलीसांनी दिली.