आ. संजय केळकर यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
नागपूर : ठाण्यातील पोलीस वसाहतींच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केळकर यांनी दुरुस्तीबाबत आणि मालकी हक्कांच्या घरांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालकी हक्काच्या घरांसाठी नवीन योजना राबवण्याचे सूतोवाच केले.
ठाणे शहरात पोलिसांसाठी असलेल्या वसाहतींची आजमितीस दुरवस्था झाली असून तातडीने दुरुस्तीसाठी पावले उचलण्याची गरज आमदार संजय केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली. या पोलीस कुटुंबांना मालकी हक्काची घरे देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीबाबत नव्याने आराखडा करून हे काम हाती घेण्यात येणार आहे. मालकी हक्काच्या घरांबाबत श्री. फडणवीस यांनी वेगळी योजना राबविणार असल्याचे सांगितले. युएलसी अंतर्गत ६५० घरे उपलब्ध झाली आहेत. तसेच ज्या ठिकाणी एफएसआय शिल्लक आहे, तेथे पोलिसांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात येतील. या जागेवर खासगी अथवा म्हाडासारख्या प्राधिकारणांमार्फत इमारती उभारण्यात येतील. पोलिसांना गृहकर्जेही उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती श्री.फडणवीस यांनी दिली.