ठाणेकरांचा अपेक्षाभंग होऊ नये हीच इच्छा !

ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून सुरु झालेला घोळ हे लिहीत असताना बहुधा संपला असेल. ज्या पक्षाला तिकीट मिळवण्यात यश येईल त्यानी बाजी मारली असा स्वाभाविक अर्थही काढला जाऊ शकतो. अतिमतः निवडणुकीत कोण बाजी मारेल आणि विजयोत्सव करील ही बाब महत्त्वाची असणार आहे. परंतु तुर्तास छोटी लढाई जिंकल्याचा आनंदोत्सव नक्कीच साजरा होईल. अर्थात तो युती धर्माला साजेसा खचितच नसेल. समन्वयापेक्षा स्वार्थ आणि स्पर्धा यांचा त्यात समावेश असेल.त्याचा निवडणुक प्रचारावर काही अंशी विपरीत परिणाम होऊ शकतो. पण ४०० पार आणि मोदींचा वलय यांचे कवच मदतीला येईल हेही लक्षात घ्यावे लागेल.
वाटाघाटीचे इलास्टिक दोन्ही पक्षांनी तुटेपर्यंत ताणले आहे आणि ते तुटू नये म्हणून सर्वप्रथम दोन्ही पक्षांना काही तडजोडी नाईलाजाने कराव्या लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सरनाईक, म्हसके किंवा फाटक यांच्याखेरीज नव्या चेहऱ्याचा विचार सोडून द्यावा लागणार आहे. काय सांगावे डॉ श्रीकांत शिंदे याना शेवटच्या क्षणी कल्याणवरून ठाण्यात आणण्याचा निर्णय घ्यावा लागेल किंवा संजीव नाईक याना धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्यास भाग पाडले जाईल. असे तर्क वितर्क करण्याची ही बहुधा शेवटची संधी असेल कारण दोन्ही कडचे नेते अंतिम निवडीवर शिक्कामोर्तब करुन बसले असतीलही. गुलदस्त्यातून ही घोषणा होताच प्रचाराला सुरुवात होईल, पण मने दुभंगली नसतीलच असे नाही. उमेदवाराला एकमताचा आधार नसेल हे कटू सत्य मान्य करावे लागेल.
मोदींचे हात बळकट करणे हा महायुतीच मुख्य अजेंडा आहे, परंतु राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत घटक पक्षांना त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या महत्वाकांशेसह जपावे लागणार आहेत. तिथे जागावाटप अधिक जिकिरीचे होणार आहे. तिथे इच्छुक असंख्य असणार आणि प्रत्येक जण आपल्या भूमिकेवर ठाम असणार. अशा वेळी छोटा आणि मोठा भाऊ हा वाद अधिक टोकदार होणार. लोकसभेच्या उमेदवारीवरून असे त्रासदायक मुद्दे प्रलंबित ठेवले गेले आहेत. ते पुन्हा डोकं वर काढणार. हा समजुतदारपण कार्यकर्त्यांत आणण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत.
ठाण्याच्या जागेवरून जो काथ्यकूट झाला तो पाहता मोदी मुद्दा फिक्का पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. तो गडद रहावा यासाठी महायुती प्रयत्न करणार. हा मुद्दाच ठळकपणे पुढे आणण्याचे काम उमेदवाराच्या प्रतिमेवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असणार आहे. आमच्या सुरुवातीपासूनच्या मुद्याचा पुनरुच्चार आम्ही करीत आहोतः कोणीही उमेदवार द्या पण मोदींचा मुखवटा त्याच्या चेहऱ्यावर फिट्ट बसायला हवा! पतंग उडवण्याची ही शेवटची संधी असेल. जो पतंग हवेत उडेल तो कापला जाणार नाही याची काळजी महायुतीला घ्यावी लागेल. काही जणांचे हात मात्र मांज्याने कापले गेले असतील. कापलेले हात आणि कापलेली तिकिटे चर्चेत मात्र कायम राहणार आहेत. अशा वेळी रोजा चित्रपटातील ते गाणे उगाच आठवलेः रुखमिणी,रुखमिणी, शादीके बात क्या क्या हुआ….कौन जीता, कौन हारा……
जाता जाता एकच वाटते की महायुतीचा उमेदवार ठाण्याच्या नजरेतून निवडला जावा. अर्थात तो त्यांच्या अपेक्षाना उतरणारा असावा. ठाणेकरांची चेष्टा होऊ नये हीच अपेक्षा!