उन्हाच्या तडाख्यात राज्यात मतदानाचा पारा घसरला

दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात 53.51 टक्के मतदान

मुंबई : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या आठ मतदारसंघातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले. हे मतदान देशातील सर्वात कमी टक्के मतदान असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदान पार पडले. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कुठे उन्हाचा तडाखा बघायाला मिळतोय, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे संभाव्य वातावरण बघता सकाळच्या सत्रात मतदारांनी अधिका-अधिक मतदान करण्याला पसंती दिली आहे. मात्र दुपारी उन्हाचा पारा वाढताच मतदानात देखील काहीशी घसरण होताना दिसली. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात 56.66 टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात 52.03 टक्के इतके मतदान झाले आहे.

मतदारसंघनिहाय टक्केवारी
वर्धा – 56.66 टक्के
अकोला -52.49 टक्के
अमरावती – 54.50 टक्के
बुलढाणा – 52.24 टक्के
हिंगोली – 52.03 टक्के
नांदेड – 52.47 टक्के
परभणी -53.79 टक्के
यवतमाळ – वाशिम -54.04 टक्के

काही ठिकाणी मतदार यादीतील घोळ पाहायला मिळाला तर काही ठिकाणी चक्क जेवणासाठी काही काळ मतदान प्रक्रिया बंद केल्याचे देखील बघायला मिळाले आहे. त्याचा थेट परिणाम हा मतदानाच्या टक्केवारीवर पडला असल्याचे बोलले जात आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44. 49 टक्के मतदान झाले असून येथे कमाल तापमान 41.04 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 40. 50 टक्के इतके मतदान झाले आहे. तर हिंगोलीचं तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. नांदेड जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 42. 42 टक्के मतदान झाले. यात भोकर येथे 43.85 टक्के, नांदेड उत्तर 41.69 टक्के, नांदेड दक्षिण 44.35 टक्के, नायगाव 40.79 टक्के तर देगलूर 46.30 टक्के आणि मुखेड येथे 37.55 टक्के मतदान झाले आहे. तसेच नांदेड तापमान 40 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 3 वाजतापर्यंत 42.55 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात आतापर्यंत कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यात दिग्रस : 45.33 टक्के, कारंजा : 43.20 टक्के, पुसद : 41.67 टक्के, राळेगाव : 48.72 टक्के, वाशिम : 42.58 टक्के आणि यवतमाळ : 35.72 टक्के मतदान झाले आहे.