असंगाशी संग….

आधीच बदनाम बनलेल्या क्षेत्रात आपण भरडले जाऊ नये याची काळजी प्रत्येक राजकारण्याला घेणे अनिवार्य ठरते. एखाद्या प्रकरणात गोवले गेल्यावर किंवा विरोधकांनी रचलेल्या कुभांडात अडकल्यावर आपण बेसावध निष्पाप होतो, असा बचाव केला तरी तो स्वीकारला जात नसतो. मुळात राजकारणी हा निष्पाप असतो ही समजूत शुध्द मूर्खपणा या सदरात मोडत असल्यामुळे अशा पदोपदी येणाऱ्या प्रलोभनांना आणि बेसावध क्षणांना बळी न पडण्याचे कसब मुरब्बी राजकारण्यांत मुरलेले असते. तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता यांना बनावट प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झालाच. त्यावर फडणवीस रितसर खुलासा करतीलही, परंतु तुर्तास त्यांना मन:स्तापाला समोरे जावे लागले ते टाळता आले असते काय हा प्रश्न चर्चेत आहे.
अमृता फडणवीस यांनी पोलिसांत तक्रार केल्यामुळे त्याबाबत चौकशीची चक्रे फिरु लागली आहेत. यथावकाश सत्य बाहेर येईल आणि त्यांच्यावरील बालंट निघूनही जाईल. परंतु तोवर कायम संशयाने पाहणारा समाज राजकारण्यांकडे संशयाने पहात रहाणार.
एकीकडे बऱ्याच दिवसांनी फडणवीस यांना कोंडीत पकडण्याची संधी मिळाली म्हणून विरोधी पक्षात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या असताना, त्या बदनामीला थोपवण्यासाठी उध्दव ठाकरे आणि याच प्रकरणातील वादग्रस्त व्यक्तीचे एकत्रित छायाचित्र माध्यमांतून प्रसारित झाले. फोटो काढला गेला तेव्हा श्री. ठाकरे यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा बायोडाटा असावा ही अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरते. त्यामुळे ठाकरे यांना संशयाचा फायदा मिळू शकतो. काही वर्षांपूर्वी श्री. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोन वादग्रस्त व्यक्ती बसल्यामुळे बराच गदारोळ उडाला होता. पवारांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा हल्ला विरोधी पक्षांनी केला होता. या मुद्दयावरुन राजकारण चांगलेच तापले होते.
नेते असल्यामुळे त्यांना जनतेपासून स्वत:ला अलिप्त रहाता येत नसते, हे जरी मान्य केले तरी नेत्याच्या जवळच्या मंडळींनी आणि अधिकारीवर्गाने नेत्याला अशा वादग्रस्त माणसांपासून सावध रहाण्याचा इशारा द्यायचा असतो. त्या उपर नेता ‘अशा’ लोकांना भेटत असेल तर तो त्याचे परिणाम भोगायला तयार आहे, हे स्पष्ट होते. अशा वादग्रस्त गाठीभेटी अनेकदा नेत्याच्या संमतीने होत असतात आणि त्यामुळे त्यांना निष्पाप असल्याचा दावा करता येणार नाही. अशा व्यक्तींना भेेटण्यामागे अशी कोणती असहाय्यता असते, हे त्यांचे त्यांना ठाऊक. परंतु काही तरी जबरदस्त प्रलोभन असल्याशिवाय कोणताही नेता अशी जोखिम घेत नसतो.
गुळाला मुंगळे चिकटून बसतात तसे सत्तेला स्वार्थी माणसे चिकटून बसत असतात. त्यापैकी काही जणांच्या मागण्या न्याय असतात. त्यांचे हीत हे इतके घातकही नसते. परंतु मोठ्या प्रकरणात मोठे स्वार्थ दडलेले असतात आणि मोहाचा क्षण नाकारण्यासारखाही नसतो. अशा व्यवहारांची मोहाच्या क्षणांची, हितसंबंधांची बित्तंबातमी विपक्षाकडे असते आणि ते संधीची वाटच पहात असतात. अमृता फडणवीस यांच्या बाबतीत तसे काही झाले नसेलच असे म्हणता येणार नाही. त्यामुळे नेता जसा मोठा होत जातो तशी त्याची अशा सापळ्यात अडकण्याची शक्यता अधिक असते.
सत्तारुढ पक्षातील नेत्यांकडून काम करुन घेण्याबाबत चढाओढ असते. मंत्रालयात, मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर वगैरे ठिकाणी आम्ही अशी गर्दी अनेकदा पाहिली आहे. या गर्दीतले सारेच साधेसरळ नसतात. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असू शकते. अशा वादग्रस्त माणसाबरोबर फोटो काढला गेला तर तो भविष्यात हानीकारक ठरु शकतो. अशावेळी भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाची खात्री करुन घ्यायला हवी. परंतु आपल्याकडे राजकारण्यांचे गुंडांशी खुलेआम संबंध असल्यामुळे मुळातच त्यांना ही जोखिम वाटत नाही. अपवादात्मक घटनेत एखादे प्रकरण अंगलट आले तर खळबळ उडते. ती संपवण्याची कला चांगल्या नेत्यांमध्ये असल्यामुळे ही प्रकरणे क्वचितच चव्हाट्यावर येतात.
भारतीय राजकारण्यांचे पान गुन्हेगारांशिवाय हलत नाही. हे सर्वज्ञात आहे. एखाद्या माणसाच्या उपयुक्ततेपेक्षा त्याचे उपद्रवमूल्य नेत्याशी जवळिक साधण्यासाठी उपयोगी पडते. गेल्या जवळजवळ चार दशकांच्या पत्रकारितेच्या अनुभवातून एक गोष्ट आम्ही सांगू शकू आणि ती अशी की नेत्यांना सज्जन माणसांपेक्षा दुर्जनांबरोबर वावरणे सोपे जाते. सज्जन माणसांची व्यक्तीगत कामे नसतात त्यामुळे ते मिंधे रहात नाहीत. त्यांचा उपद्रव नसतो, त्यामुळे मूल्य असणेही असंभव! मग अशा निरर्थक माणसांबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ रहातो? दुसरे म्हणजे सज्जन लोकांशी काय बोलायचे हेही आता नेत्यांना समजत नसल्यामुळे आणि दुर्जनांची बोलायची भाषा विधायक संवादाला पुढे नेत नसल्यामुळे शक्यतो दुर्जनांशी मैत्री करणे नेत्यांना ‘कम्फर्टेबल’ वाटू लागले आहे.
आम्ही सारा दोष नेत्यांना देणार नाही. परंतु सज्जन माणसे एकत्र येतील तर निदान काही क्षण तरी नेत्याला त्यांना सहन करावेच लागेल. अशा संघटनात्मक प्रयत्नांचा अभाव नेत्यांना नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांमध्ये मिसळण्याची संधी देत असतात. पण अशा लोकांमध्ये आपण कधी गोत्यात येऊ हे ते लक्षात घेत नसतात. माणूस त्याच्या संगतीवरुन ओळखला जात असतो. नेत्यांना हा सुविचार लागू होतोच की!