* दहिसर काशीगाव मेट्रोच्या ट्रायल रनला सुरुवात
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती
* पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार
* मीरा-भाईंदरला महानगराशी जोडणार
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा कार्यान्वित होण्याच्या दिशेने आज महत्वाचे पाऊल उचलले गेले. मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडली. यावेळी मेट्रोची तांत्रिक पाहणीही करण्यात आली.
या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार मनिषा चौधरी, आणि माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्यासह एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त–१, श्री.विक्रम कुमार, एमएमआरडीए च्या व्यवस्थापकीय संचालक, एमएमएमओसीएल रूबल अग्रवाल आणि मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, सहायुक्त दत्ता शिंदे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार निलेश गौड व अन्य अधिकारीही उपस्थित होते.
मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा डबल डेकर प्रकल्प उभारण्यात आला आहे, जिथे मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत आहेत. मेट्रो लाईन-9 चा पहिला टप्पा हा दहिसर (पूर्व) ते काशिगावपर्यंत ४.४ किमी लांबीच असून या मार्गावर दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव ही चार स्थानके आहेत.
या मेट्रोमुळे मीरा-भाईंदरकरांसाठी मुंबईच्या विविध कोपऱ्यांपर्यंत पोहोचणं अधिक सोयीचं आणि वेगवान होणार आहे. या मार्गामुळे दहिसर टोल नाका परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. वायू आणि ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट होईल. ऊर्जा बचतीसाठी ‘रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे तसेच पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस म्हणाले, “या प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या आहेत. ही मेट्रो लाईन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. पहिल्यांदाच मेट्रो आणि उड्डाणपूल एकत्रित स्वरूपात तयार करण्यात आले आहेत. मीरा-भाईंदरसाठी ही लाईन मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. यावर्षी ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि तिसऱ्या वर्षी ६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. २०२७ पर्यंत मेट्रो प्रवासाचा झपाट्याने विस्तार होईल, असेही श्री. फडणविस म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरारपर्यंतच्या विस्तारामुळे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मेट्रोशी थेट जोडणी मिळेल. एमएमआरडीएच्या नेतृत्वात ३३७ किमी लांबीचं मेट्रो नेटवर्क उभारलं जात आहे. दरवर्षी ५०-६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे वाहनांची गर्दी कमी होईल आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल, असे श्री.शिंदे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मेट्रो लाईन-9 ही सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरणारी आहे. कमी वेळात जास्त अंतर पार करण्याची सुविधा, इंटरचेंजेसमुळे अधिक सुगम प्रवास, आणि एकूणच आर्थिक गतिशीलता वाढवणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे श्री.पवार म्हणाले.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, मेट्रो लाईन-9 ही फक्त एक नवीन लाईन नाही, तर मीरा-भाईंदरला संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ही लाईन मेट्रो 2A, 7, 1 आणि भविष्यातील लाईन 10 व 13 शी सहजपणे जोडली जाईल. त्यामुळे मीरा-भाईंदरहून अंधेरी, घाटकोपर, ठाणे आणि वसई-विरारसारख्या भागात अखंड प्रवास शक्य होईल. ‘मिनिटांत मुंबई’ ही आपली संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही लाईन एक निर्णायक पाऊल आहे. ही ट्रायल रन फक्त एक तांत्रिक चाचणी नसून मीरा-भाईंदरसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी शाश्वत, सुलभ आणि सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.