११४९ खड्डयांपैकी १००६ खड्डे बुजवल्याचा ठामपाचा दावा
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत खड्ड्यांची संख्या ११४९ झाली असून यातील १००६ खड्डे भरल्याचा दावा महापालिकेने केलेला आहे. सर्वाधिक ४१३ खड्डे दिव्यात पडले असून उथळसर, कळवा, वागळे आणि वर्तकनगर भागात खड्ड्यांनी १०० चा आकडा पार केला आहे.
पावसाळ्यापूर्वीच ठाणे महापालिकेने एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणांची बैठक घेऊन त्यांच्या मालकीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशा सुचना दिल्या होत्या. त्यानंतरही ठाणे महापालिका हद्दीत विविध भागात खड्डे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील त्याची माहिती घेऊन पालिकेने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. २६ जुलैपर्यंत खड्ड्यांची संख्या ही ९६५ एवढी होती. त्यामध्ये वाढ होऊन ती आता १,१४९ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक खड्डे हे दिव्यात पडले असून त्यापाठोपाठ कळवा, वर्तकनगर प्रभाग समितीत खड्डे पडले आहेत. सर्वात कमी खड्डे हे मुंब्र्यात पडले असून तेथे अवघे ४३ खड्डे पडल्यानंतर अद्यापही १७ खड्ड्यांची मलमपट्टी करणे बाकी असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.
प्रभाग समिती – पडलेले खड्डे – बुजविलेले खड्डे – शिल्लक खड्डे
दिवा – ४१३ ४०० १३
वर्तकनगर – ११५ १०३ १२
उथळसर – १०३ ९३ १०
नौपाडा कोपरी – ९६ ७६ २०
वागळे – १०५ ९० १५
कळवा – ११६ १०५ ११
मुंब्रा – ४३ २६ १७
माजीवडा मानपाडा ९५ ६६ २९
लोकमान्य सावरकर- ६३ ४७ १६
———————————————————————————-
एकूण – ११४९ १००६ १४३