कुरमुसे मारहाण प्रकरणी सीबीआय चौकशीची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाचा आ.आव्हाड यांना दिलासा

ठाणे : ठाण्यातील अनंत कुरमुसे मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी एक याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. ही याचिका फेटाळण्यात आल्याने आव्हाड यांना दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर ठाण्यात आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. एका खटल्यात ठाणे पोलिसांनी आपणांवर चक्क 24 गुन्हे दाखल असल्याचे नमूद करणारे खोटे प्रमाणपत्र सादर केले असल्याचे डॉ. आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

समाजमाध्यमांवर डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांवर अश्लील पोस्ट करणार्‍या एका व्यक्तीसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. या प्रकरणी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र, सदर व्यक्तीने सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली. तसेच, ज्या न्यायालयात ह्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे, त्याच न्यायालयात तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या खटल्याच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी नमूद केलेल्या अनेक खोट्या बाबी डॉ. आव्हाड यांनी उघडकीस आणल्या. या प्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे उपस्थित होते.

डॉ. आव्हाड म्हणाले की, 5 एप्रिल 2020 रोजी फेसबुकवर आपणांविरोधात अश्लील पोस्ट करणारी एक व्यक्तीसोबत आमच्या काही कार्यकर्त्यांची हमरीतुमरी झाली होती. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारले होते.  पावणेदोन वर्षानंतर त्याची याचिका फेटाळताना, “हा माणूस खोटारडा असून स्वच्छ हाताने आणि स्वच्छ हेतून न्यायालयात आलेला नाही”, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदविले होते.

सर्वोच्च न्यायालयात त्याला मदत व्हावी म्हणून राज्य सरकार म्हणजेच ठाणे पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. ते म्हणजे आधी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते; त्याच्या बरोबर उलट प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. सरकार बदलल्यानंतर प्रतिज्ञापत्र बदलतं, असे कधी होत नाही. पण, असे यावेळी घडले. त्यांनी वर्तक नगर पोलिसांवर ठपका ठेवला. या प्रतिज्ञापत्रात सर्वात धक्कादायक प्रकार असा होता की, आपणाला चक्क गँगस्टर असल्याचे न्यायालयासमोर भासविण्यात आले.  आपली गुन्हेगारी कारकिर्द असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले. वास्तविक पाहता, करमुसे प्रकरण वगळता आपणांवर एकही शारीरिक इजेचा गुन्हा नाही. आपणांवर जे गुन्हे दाखल आहेत; ते सर्व आंदोलनातील गुन्हे आहेत. पोलिसांनी जे 24 गुन्हे दाखविले आहेत. ते सर्वच राजकीय-सामाजिक आंदोलनातील असून पैकी 20 गुन्हे निकाली निघाले आहेत. आंदोलनातील गुन्हे असणारी माणसेच राजकारणात असतातच; असे गुन्हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.