उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ठाणे: नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे. ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमधून होणारे काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
कल्याण शहरातील नविनतम आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, कुमार आयलानी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
श्री.शिंदे पुढे म्हणाले, आपण आता सगळं स्मार्ट पद्धतीने करत आहोत, नवीन टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतोय आणि या माध्यमातून देखील मग आता परवाना देण्याचे काम देखील पूर्वीसारखं नसून तुम्ही आता परवाना देताना त्यामध्ये देखील नवीन टेक्नॉलॉजी आणताय. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज होणारे अपघात टळतील, असे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये एका अपघातात 25 लोक मृत्युमुखी पडले होते आणि तेव्हा राज्यातले सगळे ब्लॅक स्पॉट काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यावर देखील तुमच्या विभागाने खूप चांगलं काम केले आहे आणि त्यामुळे अपघातांमध्ये देखील आपली संख्या आता कमी झालेली आहे.
ते पुढे म्हणाले की, आपण जे नवनवीन उपक्रम हाती घेतोय त्याच्या मागचा उद्देश शेवटच्या माणसाला आपली चांगली सेवा देणे हा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लायसन्स, परमिट, रिन्यूअल अशा गोष्टी ज्या आहेत त्या तत्परतेने झाल्या पाहिजेत. लोकांना त्यासाठी विलंब लागता कामा नये, त्याचा निपटारा लवकरात लवकर झाला पाहिजे आणि प्रलंबित कामे शून्यावर आणली पाहिजे, यासाठी आपण वेगाने काम करा त्यासाठी सिस्टीमही आपल्याकडे आहे. मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या भव्य दिव्य अशा इमारतीमधून तुमच्याकडून जास्तीत जास्त कार्यक्षम काम होईल, पारदर्शकता येईल आणि नागरिकांना चांगली सेवा मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, योगायोग बघा, आज या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि सर्वसामान्य प्रवाशांना चांगली सुविधा देणाऱ्या पाच रिक्षा चालकांचा सत्कार झाला. आज त्यांचा सत्कार करताना मला आठवतंय की, साधारण 80 ते 90 च्या दशकात मी सुद्धा डोंबिवलीमध्ये रिक्षा चालक म्हणून काम करत असताना ह्याच कल्याणच्या परिवहन कार्यालयाने रिक्षा चालकाचा पहिला परवाना मला दिला होता. आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये या इमारतीचे उद्घाटन होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षा या विषयावरील पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे हेमंगिनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी केले.