प्रदेश सरचिटणीसपदी परांजपे तर, ठाणे जिल्हाध्यक्षपदी नजीब मुल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खांदेपालट

ठाणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी आनंद परांजपे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. तसेच ठाण्यातही राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहावा यासाठी ठाणे गडाची सुभेदारी नजीब मुल्ला यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल जोमाने सुरु आहे. ठाण्यातही राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवकांना संधी देण्याचे धोरण ठरवले आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी तरुण तडफदार युवा नेतृत्व नजीब मुल्ला यांची नियुक्ती केली आहे. नजीब मुल्ला यांच्यावर प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक अल्पसंख्यांक विभाग, महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महापालिका या पदांची देखिल जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुतन जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला आणि प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.