भिवंडी लोकसभेसाठी शहापूर तालुका काँग्रेस आग्रही
शहापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जागा वाटपाबाबत तिढा अजूनही सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
यावेळी बोलताना तालुका काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र भेरे यांनी भिवंडी लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाचीच पारंपारिक जागा असून या जागेवर काँग्रेस पक्षाने नऊवेळा प्रतिनिधित्व केले आहे. 2014 व 2019 मध्ये काँग्रेस पक्षाच्या चुकीमुळे व मोदी लाटेमुळे ही जागा काँग्रेसने गमावली होती. परंतु मागील 10 वर्षांमध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपा अकार्यक्षम व अपयशी ठरल्यामुळे पुन्हा ही जागा काँग्रेस पक्षालाच मिळणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वरिष्ठांकडून सुटल्याची खोटी बातमी प्रसार माध्यमांवर फिरत असून ही बातमी खोटी आहे व त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन श्री. भेरे यांनी केले. संपूर्ण कोकण भागामध्ये ही एकमेव जागा काँग्रेस पक्षाची असून जर या जागेवर काँग्रेस उमेदवार दिला नाही तर संपूर्ण कोकण प्रांतामध्ये काँग्रेस नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.
भाजपा पक्ष महागाई, बेरोजगारी, कृषि, महिला सक्षमीकरण, खाजगीकरण याबाबत पूर्णपणे अपयशी ठरला असून संपूर्ण देशात भाजपा विरोधी वातावरण तयार झाले आहे. याचाच फायदा घेऊन महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, व तत्सम घटक पक्षांच्या सहकार्याने ही जागा पुन्हा काँग्रेस पक्षच जिंकणार असल्याचा आत्मविश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी दर्शविला.
याप्रसंगी काँग्रेस जेष्ठ नेते तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीपत संगारे, आदिवासी जिल्हा मंडळप्रमुख दत्तात्रय बरोरा, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शिवराम मोगरे, शहापूर तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष जयकुमार करण, ठाणे जिल्हा सहकार मंडळ प्रमुख नामदेव गगे, शहापूर तालुका उपाध्यक्ष अन्वर शेख, तालुका सचिव प्रदीप दुटे, तालुका सरचिटणीस प्रसाद दुमाडे, अनुसूचित जाती तालुकाप्रमुख संतोष साळवे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संतोष धोंनर, कसारा जि.प. गट अध्यक्ष संतोष वेखंडे, डोळखांब विभाग अध्यक्ष हरिचंद्र विशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बदलापुरात काँग्रेस आक्रमक
बदलापूर : भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केल्यापासून महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे राहणार की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे जाणार याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही ही परिस्थिती कायम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली असून भिवंडीच्या जागेसाठी आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भिवंडीची जागा काँग्रेसला न मिळाल्यास ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष जाधव यांनी आज बुधवारी बदलापूर शहर काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी, प्रदेश सचिव हरिश्चंद्र थोरात, दादासाहेब पाटील, सुरेश मोहिते, मनोज शुक्ला, शकुंतला राजगुरू, वैभव सदाफूले, विवेक तायडे, नितू देशमूख अमित काकडे-पाटील आदी उपस्थित होते. भिवंडी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे राहणे क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय आता या मतदार संघात काँग्रेसला पोषक वातावरण असून उमेदवारही सक्षम आहेत. असे असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून भिवंडीच्या जागेवर दावा केला जात आहे, हे चुकीचे असल्याचे मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी मतदार संघातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी त्यांनी भिवंडीची जागा काँग्रेसकडे राहील,याबाबत आश्र्वासित केले होते. त्याचप्रमाणे राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र प्रमाणे कोकणातील एकमेव असलेल्या भिवंडीच्या जागेवर ठाम रहावे, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. गेल्या अनेक वर्षात ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचे खासदार आमदार नसल्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसत आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडून गेल्यास त्याचा पक्ष संघटनेवरही याचा परिणाम होणार त्यामुळे काँग्रेससाठी अनुकूल असलेली भिवंडीची जागा काँग्रेसने सोडता कामा नये, अशी भावना बदलापूरच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.