भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या १०६ पैकी २० जागा या ओबीसींसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यात १० महिला व १० पुरुषांचा समावेश असणार आहे. याशिवाय चार जागा अनुसूचित जाती व दोन जागा अनुसूचित जमातीसाठी तर महिलांसाठी निम्म्या म्हणजेच ५३ जागा असतील, अशी आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेत सध्या ९५ नगरसेवक असून त्यात २६ जागा या ओबीसी समाजासाठी होत्या. ओबीसींच्या गणनेनुसार गोळा केलेल्या इम्पिरिकल डेटाच्या अनुषंगाने ओबीसींचा टक्का कमी असल्याने जागांचे आरक्षणही कमी मिळाले आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या जागा ११ ने वाढून १०६ इतक्या झाल्या असताना ओबीसींच्या आरक्षित जागा कमी होऊन २० वर आल्या आहेत. त्यातील १० जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित असून त्यातील एक जागा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असेल. अनुसूचित जातीसाठी चार जागा आरक्षित असतील व त्यापैकी दोन जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी असणार आहेत. ओबीसी, अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीसह महिलांचे आरक्षण सोडत लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच प्रभागांतील चित्र स्पष्ट होणार आहे.