ठाणे : उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील गोकुळ नगर परिसरात अनधिकृत बांधकाम प्रकरणी उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत स्वतःहुन बांधकाम हटवण्यात आले नाही तर पालिका या बांधकामावर कारवाई करणार असून संबंधीतांवर फौजदारी गुन्हा देखील दाखल करणार आहे.
उथळसर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील जरीमरी मंदिराच्या बाजूला मालमत्ता क्रमांक १०७१०७८/घर क्रमांक ५१६ या मालमत्तेची पालिकेच्या वतीने पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीमध्ये अनधिकृत बांधकाम करून कार्यालय तसेच निवासी वापर होत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. कर विभागाकडून कागदपत्रे तपासण्यात आल्यानंतर यामध्ये संबंधित मालमत्ता ही सुरजदेवी कोठारी यांच्या नावे असून भोगवटादार म्हणून भाजपच्या नगरसेवकाचे नाव लावण्यात आले आहे. सुरजदेवी कोठारी तसेच भाजपच्या नगरसेवकाला यापूर्वी २६० ची नोटीस देण्यात आली आहे. तसेच बांधकामांच्या संदर्भातील कागदपत्रे घेऊन हजर राहण्यासाठी देखील पत्र देण्यात आले होते. मात्र मात्र सुनावणीला उपस्थित न राहता संबंधितांकडून पुढील तारीख मागून घेण्यात आली आहे. पुढच्या वेळी सुनावणीला उपस्थित राहिले मात्र बांधकाम परवानगीचे कागदपत्र सादर करू शकले नाही. त्यामुळे पहिली २०१८ साली पाठवण्यात आलेली नोटीस आणि आता २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पाठवण्यात आलेल्या नोटिसीच्या कालावधीत कागदपत्रे सादर करू न शकल्याने अखेर उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच अनधिकृत बांधकामावर कारवाई करून त्याच्या खर्च वसूल करण्यात येणार असल्याचे नोटिसीमध्ये स्पष्ट केले आहे.