दुर्घटनाग्रस्त धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन नाही : ठामपाचा निर्णय

ठाणे : धोकादायक आणि त्यातही ती इमारत बेकायदा असेल तर त्यात राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन करता येणार नाही, असा निर्णय ठाणे महापालिकेने २०१९ मध्येच घेतल्याने कल्याणसारखी दुर्घटना ठाण्यात घडली तर रहिवाशांसमोर बिकट प्रसंग उभा राहणार आहे. कल्याणच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी केल्यामुळे हा विषय चर्चेस आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आ वासून उभा आहे. पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली असून त्यानुसार पालिका क्षेत्रात ९६ इमारती अतिधोकादायक तर ४ हजार ४०७ इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी पेक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या १० तर धोकादायक इमारतींची संख्या ११० ने वाढली आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर अशा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे महापालिका शाळांमध्ये काही दिवसाकरिता तात्पुरते पुनर्वसन केले जाईल. परंतु त्यांच्या पुनर्वसनाची सोय त्यांनीच करावी अशा सूचना देखील नागरिकांना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. धोकादायक अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही असे राज्य सरकारच्या २०१८च्या अध्यादेशात स्पष्ट केले असल्याचे देखील समजते.

पावसाळ्यात धोकादायक व अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तत्काळ निष्कसित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करून राहण्यास योग्य, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करून राहण्यास योग्य आणि सी-३ म्हणजे इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणे असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या यादीत शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक प्रकारात येत असून त्या इमारती रिकाम्या करुन पाडण्याची कारवाई पालिकेने सुरु केली आहे. त्यातील २५ इमारतीत आजही रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. तसेच १५ इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली असून १० इमारतींचे धोकादायक बांधकाम काढले आहे. आता ज्या इमारती अतिधोकादायक असून त्या इमारती रिकामी करण्यात आलेल्या नाहीत, अशा इमारत धारकांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. येथील इमारत धारकांनी पर्यायी व्यवस्था पहावी असे आवाहनही पालिकेने केले आहे. तर धोकादायक इमारतींमध्ये ४ हजार ४०७ इमारतींचा समावेश आहे. मागील वर्षी पेक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही १० तर धोकादायक इमारतींची संख्या ११० ने वाढली आहे.

अतिधोकादायक इमारतींमध्ये सर्वाधिक ६३ इमारती या फक्त नौपाडा प्रभाग समितीत आहेत. तर सी २ ए या प्रकारातही २१  इमारतींचा समावेश येथे आहे. दुसरीकडे वागळे इस्टेट भागात १०८८ इमारती या धोकादायक असल्याची आकडेवारी दिसत आहे. त्यातही मुंब्य्रात अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती या १३४३ आहेत. ज्या अतिधोकादायक इमारती आहेत त्या रिकाम्या करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सूत्रांनी  सांगितले.

चौकट

अतिधोकादायक ९६ पैकी २५ इमारती व्याप्त

९६ अतिधोकादायक इमारतींपैकी २५ इमारती व्याप्त असून त्या रिकाम्या करण्याचे कसब पालिकेला दाखवावे लागणार आहे. यात वाणिज्य १५१ दुकाने असून ५४७ कुटुंब आणि इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाची संख्या २०७५ इतकी आहे.

प्रभाग समिती – सी १ – सी २ ए – सी २ बी – सी ३ – एकूण
नौपाडा,कोपरी  – ६३ – २१ – ३०७ – ५९  – ४५०
वागळे – ०० – ०२ – १०८८ – ०७ – १०९७
लोकमान्यनगर – ०६ – १५ -१९९ – ०४ – २२४
वर्तकनगर – ०० – २३ – ३० – ०९ – ६२
माजिवडा – ०९ – १३ – १२३ – ३७ – १५७
उथळसर – ०८ – ०८ – ११४ – ३७ – १६७
कळवा – ०६ – १४ – १७३ – ५३ – २४६
मुंब्रा – ०४ – १०९ – ३७५ – ८५५ – १३४३
दिवा – ०० – ०१ – ७७ – ५८३ – ६६१
————————————————————–
एकूण – ९६ – २०६ – २४८६ –