नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले आहेत. अशा परिस्थितीत गृह मंत्रालयाने ७ मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. या दिवशी सर्व राज्यांमध्ये सायरन वाजतील. सुरक्षा यंत्रणांना यासंदर्भातील आदेश गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेले आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढलेला असताना आपत्कालीन परिस्थितीत नेमकं काय करावं, याची माहिती नागरिकांना व्हावी, या हेतूनं ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल होईल.
आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्ज राहण्याच्या दृष्टीनं ७ मे रोजी सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येईल. नागरी सुरक्षा अभ्यासाचा भाग म्हणून गृह मंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आलेले आहेत. मॉक ड्रिलवेळी एअर रेड वॉर्निंग सायरन वाजवण्यात येईल. शत्रूच्या हल्ल्यावेळी स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं याचं प्रशिक्षण सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रिलच्या दरम्यान ब्लॅक आऊटची तयारी करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण संस्था आणि कारखाने यांना लवकरात लवकर लपवण्याची व्यवस्थादेखील करण्यात येईल. आपत्कालीन परिस्थितीत सुटकेच्या योजना अपडेट करण्याच्या आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अंतर्गत सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीमधील तयारी मजबूत करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे.
पाकिस्तानचं कंबरडं मोडण्यासाठी गेल्या १३ दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू जल समझोता करार रद्द केला आहे. त्यामुळे भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू नदीचं पात्र कोरडंठाक पडलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.