अंबरनाथ : अंबरनाथमधील शेकडो झोपडीधारकांना आगामी काळात सात मजली इमारतीत हक्काची घरे मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
अंबरनाथच्या प्रकाश नगर झोपडपट्टीचा झोपडपट्टी पूनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) विकास करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून लवकरच सर्वेक्षणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंबरनाथ पूर्व भागात सुमारे ५० वर्षापासून प्रकाश नगर झोपडपट्टी वसलेली असून या झोपडपट्टीमध्ये सुमारे १५०० हून अधिक झोपडीधारक वास्तव्यास आहेत. या झोपडपट्टीचा एसआरए योजनेअंतर्गत विकास करून तेथील झोपडी धारकांना हक्काची पक्की घरे मिळावी यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नाला यश येऊन मंगळवारी (ता.१०) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी मुंबईतील वांद्रे येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला उल्हासनगर प्रांत अधिकारी जयराज कारभारी, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, एसआरएचे सचिव संदीप देशमुख, उपजिल्हाधिकारी वैशाली ठाकूर, उपमुख्य अभियंता नितीन पवार तसेच संबधित अधिकारी व बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी नगरसेवक रवींद्र पाटील, विजय पाटील, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान प्रकाश नगर येथील झोपडपट्टीधारकांना प्रकाश नगर लागत असलेल्या सर्वे क्र.१६६/५ या शासकीय जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत सात मजली इमारती उभारून हक्काची पक्की घरे मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याच्या नियोजित जागेची भूमी अभिलेख विभागामार्फत तातडीने मोजणी करून घेणे, त्याचबरोबर ड्रोनमार्फत देखील सर्वे करणे आणि या झोपडपट्टीमधील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्व्हे करून त्यांची पात्रता निश्चित करण्याचा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सर्वेची संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने पार पाडून याठिकाणी पुनर्वसन योजना राबविण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या. त्यामुळे या योजनेच्या कामाला आता गती मिळणार असून येथील नागरिकांना पक्की व हक्काची घरे मिळाल्याने येथील नागरिकांचे जीवनमान सुधारू शकेल असे मत आमदार डॉ.किणीकर यांनी यावेळी व्यक्त केले.