शिवसेना नेत्यांची खिल्ली; राज्यपालांवर सडकून टीका

मनसे वर्धापन दिनी राज ठाकरे यांचे टीकेचे बाण

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ वर्षानंतर पहिल्यांदाच केलेल्या जाहीर भाषणात तुफान फटकेबाजी केली. आज मनसेचा १६ वा वर्धापनदिन पुण्यात झाला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खुमासदार भाष्य केले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची मिमिक्री करताना राज ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली. संजय राऊत किती बोलतात, कसं बोलतात? म्हणत त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये टोलेबाजी केली.

मी एकदा असंच एका कार्यक्रमात गेलो होतो. एक नेता माझ्या शेजारी बसला होता. तेवढ्यात त्याच्या नावाची भाषणासाठी अनाऊन्समेंट झाली. तो मला म्हणाला, आलोच मी भाषण करुन… मग त्याने भाषणाला सुरुवात केली. थोड्या वेळापूर्वी अतिशय चांगला बोलणारा नेता, वेगळाच आवाज काढू लागला. आता वेगळा आवाज काढायची स्टाईलच झालीय, सध्या सकाळी टीव्ही लावला की ते संजय राऊत येतात, काय ते राऊत, किती बोलतात, कसं बोलतात…? बोलणं हा मुद्दा नाही, पण काय बोलावं, कसं बोलावं”, असं म्हणत त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली.

“भुवया उडवून बोलणं, हावभावाने बोलणं, आपण काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या त्यांची ही नाटकी पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?”, असं म्हणत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतनाची गरज असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

सोळावं वरीस धोक्याचं, पण मनसेसाठी मोक्याचं’

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सभेची प्रस्तावना केली. सुरुवातीलाच त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जान भरली. मनसेचं  सोळावं  वरीस इतरांसाठी धोक्याचं आहे पण मनसेसाठी मोक्याचं आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले. तसंच मुंबई आणि पुण्यात तरी परिस्थिती पाहून वातावरण बदलतंय याचा अंदाज येतोय असं सांगत महापालिका निवडणुकीत नुसतं लढायचं नाही तर जिंकायचंय या हेतूने मैदानात उतरु आणि कामयाबी मिळवू, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.

राज्यपालांवर टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “हे महाराष्ट्राचे राज्यपाल, यांना काही समज आहे का? शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल काही अभ्यास नसताना त्यावर भाष्य काय करायचं आणि समाजात भांडणं लावायची हे त्यांचे उद्योग आहेत असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे.