Miss World 2021 स्पर्धेवर करोनाचे सावट, भारताचे प्रतिनिधित्व करणारी मानसा वाराणसी बाधित

जगभरात पुन्हा एकदा करोनाने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. जगात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम मिस वर्ल्ड २०२१ या स्पर्धेवरही पडला आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मानसा वाराणसी करोनाच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.

मिस वर्ल्ड २०२१ ही स्पर्धा कोव्हिडमुळे आधीच लांबणीवर पडली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२१ रोजी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र सौंदर्यवती मनसा वाराणसी हिला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

हरनाज सिंधू हिने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर आता सर्वांच्याच मिस वर्ल्ड या स्पर्धेकडे लागल्या होत्या. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सौंदर्यवती मानसा वाराणसी करत आहे. मात्र नुकतंच तिला करोनाची लागण झाल्याने हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. मिस इंडिया ऑर्गनायझेशनने याबाबतची माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे मिस वर्ल्डने इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, मिस वर्ल्ड २०२१ च्या स्पर्धक, कर्मचारी, क्रू आणि सामान्य लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोर्तो रिकोमधील अंतिम फेरी तात्पुरती पुढे ढकलण्यात येत आहे. ही अंतिम फेरी पुढील ९० दिवसांत पोर्तो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रेलॉट येथे आयोजित करण्यात येणार आहे.