* गृहमंत्र्यांनी विश्वासात न घेतल्याची एकनाथ शिंदेंची तक्रार
* १२ तासांत पाच बदल्यांना स्थगिती
मुंबई : राज्यात काल तब्बल 39 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या मात्र या बदल्यांवरून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे. काल तडकाफडकी झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधिक्षक आणि उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली गेली होती. मात्र हा निर्णय घेताना गृहमंत्र्यांनी आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याची तक्रार मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
याबाबत माध्यमात बातमी आल्यानंतर त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनी या पाच बदल्यांना स्थगिती दिली आहे.
राज्याच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक काढून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत माहिती देण्यात आली होती. बुधवारी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. परंतु, अवघ्या 12 तासांतच या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. याच आदेशाला गृहविभागानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांमधील गृहविभागाचा अजब कारभार समोर आला आहे. गृहविभागाच्या या कारभाराची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.