भिवंडीत वासरांना लम्पी रोगाची लागण

* जिल्हा प्रशासन सावध;
* जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील तळवली पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत एका वासरामध्ये लम्पी चर्मरोग सदृश्य लक्षणे आढळून आलेली आहेत. त्या याआधी या वासरांना जन्म देणाऱ्या गाईमध्येही या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा यंत्रणा सावध झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली जाहीर केली आहे.

राज्यातील जळगाव, अहमदनगर, पुणे, लातूर, सातारा, अमरावती सोलापूर, कोल्हापूर जिल्हयामध्ये सद्य:स्थितीत गो आणि म्हैसवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील तळवली पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत वासरांमध्ये लम्बी चर्मरोग सदृश्य लक्षणे आढळून आलेली आहेत. या वासरांना जन्म देणाऱ्या गाईमध्ये यापूर्वी लक्षणे आढळून आलेली होती व त्यांना सुध्दा लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलेले होते. त्यामुळे सद्य:स्थितीत ठाणे जिल्हयामध्ये भिवंडी तालुक्यात लम्पी चर्मरोग सदृश्य लक्षणे दिसून येत आहेत.

लम्पी स्किम डिसीज या रोगाचा प्रादूर्भाव व प्रसार रोखण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून व पशुसंवर्धन खात्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या आदेशान्वये ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशी यांचा कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांची शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यासाठी मनाई करण्यात आलेली आहे.

प्राण्यांमध्ये संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये अधिसूचित केलेल्या रोगामध्ये लम्पी चर्मरोग या रोगाचा अनुसूचित रोग म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. हा रोग सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणणे आवश्यक आहे. यामुळेच ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अशोक शिनगारे यांनी लम्पी चर्मरोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित केले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयातील लम्पी चर्मरोगावर (एल.एस.डी.) नियंत्रण प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रतील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास, गो-जातीय प्रजातीची बाधित असलेले कोणतेही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गो-जातीय तसेच म्हैसवर्ग प्रजातीचा कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्याच्या उपयोगासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अश्या प्राण्याचे शव, कातडी किंवा अन्य भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे, गो-जातीय प्रजातीची गुरे व म्हशीच्या कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गो-जातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे, यास मनाई करण्यात आली आहे तसेच नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गो-जातीय प्रजाती प्राण्यांच्या बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी ठाणे अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.