ठाणे : ठाणे शहर पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिकारी-कर्मचारी व पोलीस कुटुंबियांसाठी पाच किलोमीटर मिनी मॅरेथॉनचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.
या मिनी मॅरेथॉनमध्ये ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे, परिमंडळ पाचचे उपायुक्त अमरसिंह जाधव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
पोलीस दलातील कर्मचारी यांना नियमित व सातत्यपूर्ण सहभागाअंती पाच किलोमीटर अंतर सहज धावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच स्वतःची शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी ठाणे शहर पोलीस दलाने मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीच्या 75 वर्ष पूर्तीनिमित्त फिट राईज -75 दिवसीय फिटनेस कार्यक्रमाचे आयोजन 27 ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आले होते. त्याचवेळी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वतीने रुस्तमजी अँथेना, पाईप लाईन रोड, माजीवाडा,ठाणे या ठिकाणी पाच किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मिनी मॅरेथॉनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक आणि 500 पोलिस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांनी सहभाग घेतला.