अवकाळीने रब्बीचे नुकसान; खरीपाबाबत शेतकरी संभ्रमात

भिवंडी तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त

भिवंडी: एकीकडे मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांना चांगलाच तडाखा दिला आहे. दुसरीकडे या अवकाळी पावसाने रब्बी हंगामाच्या भातशेतीसह भाजीपाला लागवडीची नासधूस केली आहे. त्यातच भातशेतीचा खरीप हंगामही जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या निर्देशानुसार या वर्षीचा मान्सून राज्यात लवकरच दाखल होणार आहे, परंतु मागील दोन वर्षांपासून ऐन मान्सूनमध्ये वरुणराजाने दडी मारल्याचे दिसून आले. तर या वर्षी ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस चांगलाच कोसळत आहे. काल मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटांसह काही वेळ मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसाने ऐन खरीप हंगामातील मान्सूनमध्ये म्हणजे जून महिन्यात दडी मारल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची भीती स्पष्ट होत आहे. तसेच जूनमध्ये अतिवृष्टी झाल्यास भातपीक वाहून गेल्यास शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पावसाचा लपंडाव पाहता शेती मशागतीच्या कामांना पूर्णविराम लावल्याचे दिसून येत आहे. तसेच शेती कामाकरीता लागणाऱ्या मजुरांची मजुरी वाढल्याने भातशेतीचे पीक घेण्यासाठी धाडस न केल्याने शेतीचा टक्काही घसरला आहे.

दरम्यान भिवंडी तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यात भातपिकाचे क्षेत्रफळ १६६८९ हेक्टर आहे. आताही भातपिकाचे तितकेच क्षेत्रफळ आहे. यामध्ये हळव्या भात प्रकाराची शेती ४१७२.२५ हेक्टर क्षेत्रात होत आहे. निमगरवा शेती ९१७८.९५ हेक्टर क्षेत्रात आणि गरवा शेती ३३३४.८० क्षेत्रात होत आहे. भिवंडी तालुक्यातील एकूण रोपवाटिका क्षेत्र १६६८.९० हेक्टर इतकी असून या वर्षी भातशेतीचा टक्का मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे हवामान विभागाच्या मान्सूनच्या अंदाजाने शेतकऱ्यांना यावर्षी सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येत असले तरी वास्तविक कसा आणि किती प्रमाणात पाऊस पडणार हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे बळीराजावर यंदाही दुबार पेरणीचे संकट ओढवणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हवामान विभागाने येत्या ७ जून रोजी महाराष्ट्र राज्यात मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. त्या अनुषंगाने भात बियाणे केंद्रांमध्ये बियाणे उपलब्ध झालेले आहेत. वेगवेगळ्या भात प्रकारातील भात बियाणे खरेदी करून बळीराजाने खरीप हंगामातील भातशेतीला सुरुवात करण्यास हरकत नसावी, असा सल्ला भिवंडी तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव शिंदे यांनी दिला आहे.