दुबार मतदारांच्या आरोपाला केराची टोपली?
ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीकरिता लोकसभा निवडणुकीतील मतदार याद्याच वापरण्यात येणार असून त्यामधील दुबार नावे कमी केली जाणार नाहीत. त्यामुळे माजी खासदार राजन विचारे यांच्या तक्रारीला निवडणूक विभागाने केराची टोपली दाखवल्याची चर्चा सुरु झाली आहे.
माजी खासदार श्री. विचारे यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पुराव्यासह दुबार नावांची यादी 5 ऑगस्ट रोजी दिली होती. निवडणूक आयोगाने त्याची चौकशी करून ही नावे कमी करावीत, अशी मागणी केली होती. एका-एका मतदाराचे तीन-तीन मतदार यादीत नावे घुसवण्यात आले आहे. त्या मतदारांनी तीन-तीन वेळा मतदान केल्याने पराभव झाल्याचा दावा देखिल श्री.विचारे यांनी केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्यामध्ये ही दुबार नावे आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात एक लाख ६६,९१० दुबार मतदारांची नोंदणी झाल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणले आहे. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली नसल्याचे समजते.
नुकत्याच निवडणूक आयोगाच्या बैठकीत ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दुबार नावांचा प्रश्न उपस्थित केला होता, परंतु निवडणूक एक ते दीड महिन्यावर आली आहे. मतदार यादीतील नावे कमी करण्याच्या प्रक्रियेला जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही नावे कमी होण्याची शक्यता नाही. या नावांची तपासणी करण्यात येणार असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत या लोकसभा निवडणुकीतील मतदार याद्याच वापरल्या जाणार आहेत. त्यामध्ये नवीन मतदारांचा समावेश केला जाणार आहे, मात्र दुबार नावे कमी केली जाणार नाहीत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ठाणेवैभवला सांगितले.