ठाणे : ठाणे जिल्ह्यात औषध दुकान चालवणा-या तब्बल 108 विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील औषधांच्या दुकानांमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट पूर्णवेळ उपस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये औषधांची विक्री करणे, नशा येणारी आणि गुंगीकारक औषधांच्या खरेदी आणि विक्रीच्या ताळमेळ बसणे अपेक्षित आहे. परंतु त्यात अनियमितता आढळल्यास औषध विक्रीच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई केली जाते.
गेल्या वर्षभरामध्ये ठाणे जिल्ह्यातील अशा 108 विक्रेत्यांचा परवाना निलंबित केला असून 36 विक्रेत्यांचा परवाना रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात 12,664 मेडिकल दुकाने आहेत आणि जिल्ह्यामध्ये किरकोळ औषधांचीही विक्रीची 866 दुकाने असून घाऊक विक्रीची 98 दुकाने आहेत, अशी माहिती एफडीएच्या सूत्रांनी दिली.
एफडीए विभागाने ठाणे जिल्ह्यात घाऊक औषधांच्या विक्रीच्या 224 दुकानांची तपासणी एप्रिल ते डिसेंबर 23 या कालावधीमध्ये करण्यात आली होती. तर किरकोळ औषध विक्रीच्या 467 दुकानांमध्ये तपासणी करून विक्री योग्यरितीने होते की नाही याचीही पडताळणी केली आहे.
विक्रेत्यांचे परवाने रद्द, नोटीसही बजावली.
अनियमितता किंवा त्रुटी आढळलेल्या किरकोळ औषध विक्रीच्या 124 दुकानांना औषध विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यापैकी 73 दुकानांचे परवाने निलंबित केले. तर 27 विक्रेत्यांचे परवाने रद्द केले. त्याचप्रमाणे घाऊक 52 औषध विक्रेत्यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. 35 विक्रेत्यांचा परवाना निलंबित केला असून नऊ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.
परवाना एकाचा…चालवतो दुसराच
औषध विक्रीच्या दुकानांमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट पूर्णवेळ उपस्थित नसणे तसेच त्याच्या गैरहजेरीवेळी अन्य व्यक्तीने वर्गीकृत औषधांची विक्री करणे तसेच वर्गीकृत व नशा येणारी तसेच गुंगीकारक औषधांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार, शेड्युल एचवन औषधांच्या विक्रीची स्वतंत्र नोंदणी ठेवणे, बिलांमध्ये पेशंटचे आणि डॉक्टरांचे नाव नसणे, खरेदी बिले न ठेवणे आणि डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषधांची विक्री करणे अशा औषध विक्रेत्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द केले जातात, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाचे सह-आयुक्त नरेंद्र सुपे यांनी दिली
औषध विक्रेत्यांनी मेडिकलच्या दर्शनी भागात रुग्णालयातील रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती नाही, अशा आशयाचा फलक लावावा, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तसेच बिलाशिवाय औषध विक्री दुकानांतून औषधांची खरेदी करू नये, अशी माहिती श्री. सुपे यांनी दिली.