ठाणे विभागातून १७५ बसगाड्या
ठाणे : कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांत गौरी व गणपतीच्या सणाला कोकणात जाताना मनात असलेल्या धाकधुकीमुळे हजारो भाविकांना सणाचा आनंद घेता आला नसल्यामुळे, यावर्षी आषाढीवारीसाठी त्यांचा हिरमोड होऊ नये यादृष्टीने एस. टी. महामंडळाने ठाण्याहून तब्बल १७५ बसेसच्या ताफ्याची जय्यत तयारी केली आहे.
वारीला जाऊ इच्छिणा-या वारक-यांसाठी आठ आगारांमधून या बसगाड्या सोडण्यात येतील. ठाणे जिल्ह्यातून सुटणा-या गाड्यांच्या संगणकीय आरक्षणाला प्रारंभ झाला आहे. येत्या १० जुलै रोजी लाखो वारकरी पंढरपूरला आषाढी एकादशीचा सोहळा अनुभवणार आहेत. ठिकठिकाणांहून पंढरपूरला जाणा-या वारक-यांकरीता एसटी महामंडळ घेऊन जाण्याची आणि परतीच्या प्रवासाचीही व्यवस्था करणार आहे. त्याकरीता विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येईल. काही शहरांत, गावांमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे एसटी महामंडळाने या राज्यांतून ४,७०० बसेस् सोडण्याचे नियोजन केले आहे. ठाणे जिल्ह्यातील एक आणि दोन व कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी, मुरबाड, वाडा, शहापूर स्थानकांतून ही सुविधा मिळणार आहे.
पंढरपूरला जाऊ इच्छिणा-या वारक-यांसाठी समुह आरक्षणाची सुविधा देण्यात येईल आणि एकाच गावात राहणा-या वारक-यांनी एसटीच्या समूह आरक्षणाची सुविधा घेतल्यास आगाराऐवजी बसगाडी त्यांच्या राहत्या ठिकाणी जाणार आहे व त्यांना यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाईल. दूर गावांतील वारक-यांसाठी ही मोठी सुविधा आहे, वारीला जाण्यासाठी बसगाड्यांचे आरक्षण आदी त्रास सोसावा लागणार नाही. त्यांची धावपळ होणार नाही.
यंदाच्या गौरी, गणपतीसाठीही अंदाजे एक हजार बस
कोरोनाच्या काळात सन २०२१ या वर्षात ८४६ बसगाड्या कल्याण, ठाणे, विठ्ठलवाडी, बोरिवली, भांडुप, मुलुंड व भाईंदर येथून सोडल्या होत्या. यावर्षी अंदाजे एक हजार बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आदी ठिकाणी बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. गौरी आणि गणपती उत्सवाला जाणा-या भाविकांसाठी यावेळी २८ जूनपासून आगाऊ आरक्षण सुरु झाले आहे. समूह आरक्षणासाठी भाविकांचा गट तयार झाल्यास त्यांना ते जेथून प्रवासाला सुरुवात करतील तेथेपर्यंत बसगाडी जाईल आणि अशा सामुहिक प्रवाशांना त्यांच्या ईप्सित स्थळी पोहचवण्यात येईल. प्रवाशांनी शिवशाही बसची मागणी केल्यास त्याचेही आरक्षण करण्यात येणार असल्याचे एसटी अधिका-यांनी सांगितले.