भिवंडी लोकसभेच्या लढतीत कुणबी-मुस्लिम मते निर्णायक

भाजप, राष्ट्रवादी आणि वंचितची तिरंगी लढत अटळ

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघातील तिरंगी लढतीमधील उमेदवारांचे भवितव्य कुणबी आणि मुस्लिम मतदारांच्या हातात असून या मतदारांना आकर्षित करणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात बाजी मारेल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या मतदार संघातून भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे, आणि वंचितच्या पाठिंब्यावर निलेश सांबरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात काँग्रेस ही जागा मिळावी या करिता आग्रही असून त्यांच्या वाट्याला ही जागा आली नाही तर काँग्रेस बंडखोरी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे २६ एप्रिलनंतर त्याचा फैसला होणार आहे.
भिवंडी ग्रामिण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, शहापूर, कल्याण पश्चिम आणि मुरबाड या सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे. ११ लाख ५३११ पुरुष आणि नऊ लाख ३३,८१० स्त्रिया असा एकूण २० लाख ३९,४५९ मतदार असलेला हा मतदार संघ आहे.

भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्व या दोन मतदारसंघात अल्पसंख्यांक मतदारांची संख्या जास्त आहे तर मुरबाड, भिवंडी ग्रामिण, शहापूर या मतदार संघात कुणबी आणि आगरी मतदारांचे प्राबल्य आहे. मागील निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश टावरे यांचा पराभव केला होता. श्री. पाटील यांना पाच लाख २३,५८३ मते मिळाली होती तर श्री. टावरे यांना तीन लाख ५७,२५३ मते मिळाली होती. त्यापूर्वी २०१४ला काँग्रेसचे कुणबी नेते विश्वानाथ पाटील यांना श्री.पाटील यांनी पराभूत केले होते. यावेळी श्री. पाटील हे हॅट्रिक करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत असून भाजपाने देखिल पहिल्याच यादीत त्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात कल्याण पश्चिम येथे शिवसेना शिंदे गटाचा तर मुरबाडमध्ये भाजपाचा आमदार आहे. शिवसेनेकडे दोन, भाजपाकडे दोन आणि समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघ आहे.

मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि खासदार कपिल पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरु असून श्री. कथोरे यांनी अजूनही खा. पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली नाही. या मतदारसंघात खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये होणार आहे. दोन्ही उमेदवार हे आगरी समाजाचे असून आगरी मतदार कोणाला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल तर शहापूर आणि मुरबाड येथे कुणबी मतदार असून त्यांची मते कुणबी समाजाचे निलेश सांबरे किती मिळवतात हे पाहावे लागणार आहे. समाजवादी पक्षाने आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यांचा एक आमदार या मतदारसंघात असून मुस्लिम पारंपरिक मते महाविकास आघाडीला मिळतील असे बोलले जात आहे. शिंदे गटाचे आमदार श्री. मोरे यांच्या मतदारसंघात आदिवासी समाजाची मते असून ही मते भाजपाकडे किती प्रमाणात वळविण्यात भाजपाला यश मिळते त्यावर खा. पाटील यांची हॅटट्रिक अवलंबून आहे. भाजपाच्या सर्वे रिपोर्टमध्ये श्री. पाटील हे बाजी मारणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांची विजयाची घोडदौड बाळ्या मामा रोखतात का हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
कुणबी विरुद्ध आगरी
भिवंडी लोकसभा मतदारसंघात ३७ टक्के कुणबी मते आहेत. २१ टक्के मुस्लिम, २७ टक्के दलित व अन्य तर १५ टक्के आगरी मतदार आहे. मुस्लिम आणि दलित मते ही भाजपच्या बाजूने नाहीत. एमआयएम, वंचित, आरपीआय, सपा, बसपा आणि अपक्ष उमेदवारांमध्ये ती विभागली जात असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे कुणबी व आगरी या एकगठ्ठा मतांवरच भिवंडीची निवडणूक आतापर्यंत होत आलेली आहे. म्हणूनच येथे उमेदवारी देताना आगरी व कुणबी कार्ड खेळले जाते. या लोकसभा निवडणुकीतही हेच कार्ड अधिक प्रभावी पडणार आहे. कपिल पाटील व बाळयामामा म्हात्रे हे आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे या समाजाची पारंपारिक मते विभागली जातील. तर निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे कुणबी मतांचा लाभ त्यांना होण्याची शक्यता आहे.