कोपरी पूल दुहेरी वाहतुकीसाठी जानेवारी अखेरीस खुला ?

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर नवीन कोपरी पुलाच्या फेज-दोनचे काम पूर्ण झाल्यास ठाणे आणि मुंबई दरम्यानची मुख्य वाहतूक जोडणारा ठाणे कोपरी पूल दुहेरी वाहतुकीसाठी सुरु होईल आणि जानेवारी 2023 पर्यंत या पुलांवरुन सर्व वाहने सुस्साट धावतील.

सध्या या पुलाची महत्वाची कामे सुरु असल्याने ठाणे ते मुंबईकडे आणि मुंबईहून ठाणेमार्गे गुजराथ, नाशिककडे जाणारी वाहने ठाण्यातच धिम्या वेगाने प्रयाण करतात. त्यामुळे दोन्ही द्रुतगती पुलांवर २४ तास वाहनांची प्रचंड गर्दी असते. परिणामी या पुलांची सर्व कामे एमएमआरडीए हातावेगळी केव्हा करणार, असा प्रश्न चालकांना पडला आहे.

मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने २+२ पथ मर्गिकेच्या पुलांचे ४+४ असे अपग्रेड केले जात आहे. रेल्वे मार्गावरील पुलाचा भाग एमएमआरडीएच्या निधीतून मध्य रेल्वेने बांधला आहे. तर एमएमआरडीए दोन्ही बाजूंना सिमेंट काँक्रीटमध्ये अ‍ॅप्रोच बांधत आहे. एमएमआरडीएने काँक्रिटीकरणाचा शेवटचा भाग पूर्ण केला. रस्ता दुभाजक, विद्युतीकरण, रस्ता चिन्हांकित करणे, चिन्हे आदी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. मध्य रेल्वेची कामे पूर्ण होताच हे पूल वाहतुकीसाठी खुले केले जातील. शिवाय या प्रकल्पामुळे द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना फायदा होईल तसेच मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील आनंदनगर जकातनाक्यासमोरच्या अप आणि  डाऊन रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले

कोपरी पुलाची विविध कामे दुस-या टप्प्यातील अंतिम स्थितीत आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होईल. सध्या या रस्त्यावर चार मार्गिका (लेन) आहेत, जानेवारी २०२३ च्या दुस-या आठवड्यात आठ मार्गिका (लेन) तयार होतील. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रुंदीकरण केलेला कोपरी आरओबी खुला झाल्यावर मुंबई आणि ठाणे पूर्व उपनगरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल, असे एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.