कल्याण-डोंबिवली शहरांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन, या शहरांमध्ये आणखी तीन नवीन डायलिसिस केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली. या तीन नवीन केंद्रांमुळे कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पालिकेच्या डायलिसिस केंद्रांची संख्या एकूण चार होणार आहे.
कल्याण-डोंबिवलीतील अनेक रुग्णांना सात दिवसांनी, पंधरा दिवसांनी किवा एक महिन्याच्या अंतराने डायलिसिस करून घ्यावे लागते. खासगी रुग्णालयांमध्ये किंवा केंद्रांमध्ये डायलिसिसचा खर्च अधिक असल्याने तो अनेक रुग्णांना परवडत नाही. या खर्चामुळे अनेक रुग्ण उपचार करून घेण्यास तयार होत नाहीत. काही रुग्ण डायलिसिस करण्यासाठी नवी मुंबई, मुंबई. ठाणे. कल्याण डोंबिवली येथील सामाजिक संस्था, सामाजिक सेवा देणाऱ्या वैद्यकीय संस्थांच्या माध्यमातून डायलिसिस करून घेतात. अशाप्रकारे डायलिसिस करताना खर्च कमी येत असला तरी, रस्ते मार्गाने लोकलने प्रवास करताना रुग्णांना वाहतूक कोंडी, लोकल मधील गर्दी यांचा त्रास सहन करावा लागतो. अनेक रुग्णांना एका जागी ठीक बसता येत नाही. त्यांची सर्वाधिक परवड होते.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रुग्णांची होणारी ही परवड विचारात घेऊन आयुक्तांनी डोंबिवली कल्याण शहरात तीन नवीन डायलिसिस केंद्र सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश वैद्यकीय विभाग, शहर अभियंता विभागाला दिले आहेत. या केंद्रामध्ये पिवळे आणि केसरी दुर्बल. सामान्य घटकातील रहिवाशांना निशुल्क तर सफेद शिधापत्रिका असणाऱ्या रुग्णांना माफक दरात डायलिसिसची सुविधा देण्याचा विचार सुरू आहे, असे आयुक्त सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेचे पहिले डायलिसिस केंद्र कल्याण पूर्वेतील विजय नगर भागात सुरू करण्यात आले आहे. दिवसभरात पन्नास डायलेसिस रुग्णांना सेवा मिळणार आहे.