महावितरणच्या दुर्लक्षामुळे कळभोंडे गाव दहा दिवस अंधारात

शहापूर : तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या कळभोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वीज वितरणचे विद्युत पोल पडून येथील व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने लोडशेडिंग व्यतिरिक्त तब्बल दहा दिवस गावातील वीज गायब झाली आहे. महावितरणकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने गावावर अंधारात राहण्याची नामुष्की ओढवली आहे. महावितरणच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कसारा भागातील १ हजार ३५० लोकसंख्या असलेल्या कळभोंडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नविनवाडी, लादेवाडी या भागात वादळी वाऱ्याने वीज वितरणचे पोल भुईसपाट केले आहेत. ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कसारा सेक्शनला पत्रव्यवहार करुन १५ दिवस झाले तरी त्याची दखल घेतली नसल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वीर यांनी दिली. या भागात कायम वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने विजेशी संबंधित व्यवसायिकांवर संक्रांत आली आहे. दिवसेंदिवस वीजेचा प्रश्न गंभीर होत असून यावर कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे वीर यांनी सांगितले.

ग्रामस्थच झाले लाईनमन

मागील तीन आठवड्यापासून शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. वादळी वारा आणि पाऊस यामुळे वीज वितरण कंपनीचे वाभाडे निघाले आहे. कळभोंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे पडलेले विजेचे पोल ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करून १५ दिवसानंतरही उभे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थ सुरेश अगिवले, हरेश गिरा, भालचंद्र खडके, पोलीस पाटील व शिवाजी वीर यांनी पुढाकार घेऊन इतर ग्रामस्थांच्या प्रयत्नाने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत विद्युत पोल उभे करुन वीज प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मेंटेनन्सच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा होऊनही दरवर्षी विजेचा खेळखंडोबा सुरूच असतो. गावखेड्यातही माणसं राहतात याचा विसरच महावितरण विभागाला पडतो काय असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.