* वनमंत्री गणेश नाईक यांची ठाण्यात ‘एन्ट्री’
* शिंदे गट आक्रमक भूमिकेत
ठाणे: नवी मुंबईसारखा कारभार ठाण्यामध्ये करायचा आहे, त्यासाठी ठाण्यात फक्त ‘कमळ’ फुलवायचे असून लवकरच ठाणेकर जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार सुरू करण्याचा निर्धार राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. यामुळे ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदे गट यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी सायंकाळी कोपरीतील आनंद बॅन्क्वेट सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, महिला अध्यक्षा स्नेहा पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण आदी उपस्थित होते. नागरी सत्काराला उत्तर देताना गणेश नाईक यांनी, आजवरच्या राजकिय वाटचालीचा उल्लेख करीत दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही, सकारात्मक राहुन जगा, असा टोला लगावला. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता भाजपमध्ये असल्याने शतप्रतिशत भाजपसाठीच कार्यरत राहणार असल्याचे निक्षुन सांगताना आजवर मिळालेल्या मताधिक्याचा उहापोह श्री.नाईक यांनी केला.
पुर्वी पालकमंत्री असताना गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवत असत, त्याच धर्तीवर थेट जिल्हाध्यक्ष वाघुले यांना उद्देशून, प्रशासनाला आताच सांगुन ठेवा. असे निर्देश देत ना. गणेश नाईक यांनी, ठाण्यातील जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा जनता दरबार भरवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा सेनेची युती होण्याची शक्यता कमी झाल्याचे बोलले जात आहे. सेनेच्या बालेकिल्ल्यात श्री.नाईक हे जनता दरबार भरवून त्या माध्यमातून सेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे. आगरी कोळी समाजात श्री.नाईक यांच्याबद्दल आदर आहे तसेच सेना आणि राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी श्री.नाईक यांच्या संपर्कात असल्याने भाजपाची ताकद वाढविण्यासाठी श्री.नाईक यांनी रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यात ओन्ली कमळ फुलवायचे आहे. आ. संजय केळकर आणि आ. निरंजन डावखरे यांचीही तीच इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सकारात्मक काम करीत आहे. पक्षाने ठाण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे, तेव्हा ठाणे सुरळीत करण्याचे काम माझे आहे, असेही ना. गणेश नाईक म्हणाले.
प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार-खा.म्हस्के
प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. गणेश नाईक यांचा जनता दरबार भरविण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही का विरोध करावा, असा सवाल शिवसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. आमचे कार्यकर्ते देखील पालघर आणि नवी मुंबई येथे जनता दरबार भरविण्याची विनंती करत आहेत, असे देखील ते म्हणाले. ते पुढे म्हणाले कि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो आहोत. ‘एकला चलो’ची भूमिका घेतली तर मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल, परंतु कोणाला स्वबळावर निवडणूक लढण्याची इच्छा असेल तर आम्ही देखील स्वबळावर निवडणुकीला तयार आहोत. यापूर्वी आम्ही स्वबळावर निवडणूक जिंकून सत्ता काबीज केली आहे. स्वबळावर निवडणूक लढणे आम्हाला नवीन नाही, त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना युतीचे महत्व सांगावे, असे देखील खा.श्री म्हस्के यांनी स्पष्ट केले.