ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे शोधून देण्याचा कसोशीने प्रयत्न रेल्वे कर्मचा-यांकडून केला जात अहे. गेल्या वर्षभरात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, महत्वाची कागदपत्रे असलेल्या बॅगा तब्बल सव्वादोनशेहून अधिक प्रवाशांना परत करण्यात आल्या आहेत.
या स्थानकात प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. लोकल पकडताना होणा-या धावपळीत अनेकदा सामान विसरण्याचा घटना घडतात. विसरलेल्या सामानाची पुन्हा मिळण्याची आशा धूसर असते. परंतु, ठाणे स्थानकातील रेल्वे कर्मचारी सतर्क असल्यामुळे सामान मिळण्याचा आणि त्यांचा प्रामाणिकपणा प्रवाशांना अनुभवास मिळतो. १ जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात २३० प्रवाशांना त्यांचे सामान परत करण्यात आले आहे.
कल्याणला राहणा-या एका महिलेची बॅग रेल्वे प्रवासात हरवली होती. बॅगेमध्ये सोन्याचा हार, अंगठी कपडे, पैसे होते. परंतु, रेल्वे कर्मचारी यांच्या प्रामाणिकपणामुळे सर्व मुद्देमाल असणारी बॅग मिळाली. अन्य एका घटनेत, एका लेखकाने लिहिलेली दोन नाटके आणि पुस्तक रेल्वे कर्मचा-यांनी शोधून परत संबंधिताला दिली. ठाणे स्थानकाचे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांच्या कार्यालयात सामान गहाळ झाल्याची तक्रार कोणी घेऊन आल्यानंतर त्यांचा व त्यांच्या सहका-यांचा शोधून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो, असे प्रवासीच सांगतात व तसा अभिप्रायदेखील लिहून देतात.
रेल्वे कर्मचा-यांच्या तत्परतेने आणि काही वेळा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्या रेल्वेकडे जमा झाल्यानंतर त्या-त्या वस्तूंच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात येतो. आवश्यक सोपस्कार केल्यानंतर त्यांना ती त्यांना सुपुर्द करण्याचे कौतुकास्पद काम मध्य रेल्वेतील स्थानक व्यवस्थापक, कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी आदी करतात, अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी दिली.