आयपीएलच्या लिलावाचं गणित

Image Courtesy: https://www.iplt20.com/auction/2023

आयपीएलचा लिलाव हा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. खेळाडूंना अशाप्रकारे विकत घ्यावं का नको, चूक का बरोबर हे प्रश्न गेल्या १५ वर्षांत निरर्थक ठरले आहेत आणि प्रत्येकवेळी फ्रॅंचाइजकडून अचंबित करणारे निर्णय घेतले गेले आहेत. लिलावासंजर्भात मह्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहीजे ती म्हणजे प्रत्येक फ्रॅंचाइजी बिझनेस करून त्यातून पैसे कमवायला आयपीएलमध्ये आहे. त्यामुळे लिलावासाठी येण्याच्यापूर्वी प्रत्येकाची स्ट्रॅटेजी तयार असते आणि त्यानुसार खेळाडू कोणते हवे आहेत याची यादी तयार असते. ब-याच वेळा असं होतं की एखादा ठरवलेला खेळाडू दुस-या टीमकडे जातो. त्यावेळी प्लॅन ‘बी’ तयार असावा लागतो. कोणते खेळाडू निवडायचे, त्यांची जगातल्या वेगवेगळ्या लीगमध्ये कामगिरी कशी आहे, कोणत्या खेळाडूचा मॅचमधील कोणत्या परिस्थितीमध्ये अधिक प्रभाव पडू शकतो या सगळ्याच विचार करून यादी तयार करण्यात येते.

गेली काही वर्ष आयपीएलच्या संघामध्ये व्यवहाराला परवानगी आहे लिलावाच्या आधी असलेल्या ट्रेडिंग विंडोमध्ये. मुंबईने त्याचा पूर्वी वापर करून बोल्ट आणि डी कॉकला संघामध्ये आणलं होतं. पण यावेळी मुंबईने थेट गुजराट टायटन्सला एक जेतेपद आणि एक उपविदेतेपद मिळवून देणा-या हार्दिक पांड्यालाच खेचून स्वत:कडे आणलंय. त्यामुळे अर्थातच या व्यवहाराची भरपूर चर्चा झाली. दुस-या बाजूला मुंबई इंडियन्सने कॅमरून ग्रीनला आरसीबीकडे ट्रेड करून लिलावामध्ये वापरण्याची शिल्लक तयार केली. फुटबॉलच्या क्लब्समध्ये असे व्यवहार हे होतंच असतात.
जशी लीग मोठी होईल तसे अशा प्रकारचे व्यवहार वाढत जाणार हे नक्की.

आत्ताचा लिलाव हा मर्यादित स्वरूपाचा आहे.. म्हणजे कोणत्याच टीमला आपली अख्खी टीम तयारी करायची नाही. असलेल्या टीममध्येच काही नवीन खेळाडू आणायचे किंवा ज्या खेळाडूंना टीमने बाहेरचा रस्ता दाखवला आहे त्यांच्याएवजी दुस-या खेळाडूंची निवड करायची आहे. अशावेळी टीम बांधताना प्रत्येक मॅनेजमेंटला आपल्याला नक्की काय हवंय याची पूर्ण कल्पना आहे आणि त्यानुसार खेळाडू ठरवले जातील. उदाहरणर्थ बंगलोरने आपली फलंदाजी भक्कम ठेवली आहे. पण गोलंगाजीमध्ये गेल्या वर्षीच्या अनेकांना सोडून दिलं आहे, त्यामुळे लिलावाच्या वेळी ते बहुतांशपणे गोलंदाजीकडेच लक्ष देताना दिसतील. केकेआरने गौतम गंभीरला मेंटोर म्हणून आणलं आहे, त्याला हव्या असलेल्या दोन किंवा तीन खेळाडूंकडेच केकेआर सगळी रक्कम वापरण्याचा प्रयत्न करेल.

 

लिलावाचं गणित

कोणत्याही लिलिवामध्ये सहभागी होताना मॅनेजमेंट आकडेमोड उलट्या पद्धतीने करत असते. आपल्याला कोणत्याही खेळाडूंच्या भोवती टीम उभी करायची आहे हे आधी ठरवलं जातं. कोणत्या खेळाडूंचा मार्केटिंग साठी उपयोग होईल, ब्रॅंडिग साठी उपयोग होईल, टीमच्या इमेजच्या दृष्टीने तो बदल अनुकूल असेल का आणि अर्थात कामगिरी या सगळ्याचा विचार करुन निवड पक्की करण्यात येते. अशा प्रकारची चार-पाच नावं नक्की झाल्यावर ती टीम त्या खेळाडूंसाठी आपल्याकडे असलेल्या पैशाच्या ६० ते ६५ टक्के रक्कम त्यांच्यावर खर्च करायला आनंदाने तयार असते, कारण त्यांना माहिती असतं की बाकीचे १०-१२ खेळाडू आपण सहज उरलेल्या रकमेमध्ये बसवू शकतो. यावेळी तर हैद्राबाद आणि काही प्रमाणात पंजाब सोडलं तर बाकीच्यी टीम्सना २-३ जागाच भरायची गरज आहे. पण जेव्हा एखादा खेळाडू एकाच वेळी तीन टीमच्या हिटलिस्टवर असतो तेव्हा त्याची किंमत भलतीच वाढते. कारण प्रत्येकानेच

त्याला अनुसरून प्लॅनिंग केलं असतं. उदाहरणर्थ यावेळी सॅम करन साठी चेन्नई, हैद्राबाद, पंजाब अशा तीन टीम्स नक्की प्रयत्न करतील. शेवटी कोणाला तरी माघार घ्यावीच लागते आणि प्लॅन ‘बी’चा विचार करावा लागतो. तिथेच मॅनेजमेंटची कसोटी असते. कारण टेबलवर पटापट निर्णय घ्यायचे असतात आणि सतत बदलत रहावे लागतात. एखादी टीम आपल्या एका खेळाडूच्या समावेशामुळे बाकी चार टीमचं गणित बिघडवत असते.

कोट्यावधी रूपये देऊन आपल्या टीममध्ये घेतलेल्या अनोळखी खेळाडंची आधीची कामगिरी फारशी उत्साहवर्घक नाही. त्यामुळे यंदाचे कोट्याधिश काय करतात ते स्पर्धा सुरू झाल्यावर कळेलंच.

आयपीएल २०२४ लिलावासाठी संघांकडे बाकी असलेली रक्कम

RCB – २३.२५ कोटी
SRH – ३४ कोटी
KKR – ३२.७ कोटी
CSK – ३१.४ कोटी
PBKS – २९.१ कोटी
DC – २८.९५ कोटी
MI – १७.७५ कोटी
RR – १४.५ कोटी
LSG – १३.१५ कोटी
GT – ३८.१५ कोटी

—- आदित्य जोशी
टीम स्पोर्ट्स कट्टा