भिवंडी : शहरातील कारिवली ग्रामपंचायत हद्दीत भैरव डाईंगजवळ इमारतीत सुरू असलेल्या अवैध टेलिफोन एक्सचेंजच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धाड घालून ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने एजंटला गजाआड केले. या घटनेने शहरात खळबळ माजली असून या पूर्वी देखील शहरात आंतरराष्ट्रीय मोबाईल सेवा देणारी टोळी कार्यरत होती.
केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय कॉल हे सर्वसाधारण टेलिफोन नेटवर्कमधून पाठविण्यासाठी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील टेलिकम्युनिकेशन विभागाची परवानगी लागते. हे शासकीय परवानगी न घेता कारिवली-भंडारी कंपाउंड येथील भैरव डाईंगजवळ स्काय अपार्टमेंट या इमारतीत तरबेज सोहराब मोमीन हा अवैधरित्या टेलिफोन एक्सचेन्ज चालवून त्याच्याजवळील उपकरणाद्वारे येथील नागरिकांना आंतरराष्ट्रीय कॉल जोडून देत होता. त्यामुळे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचे नुकसान होत होते. त्याचप्रमाणे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. तसेच तरबेज मोमीन हा परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल त्याच्याजवळील उपकरणाद्वारे भारतातील इच्छित मोबाईल नंबरवर अनधिकृतरित्या राऊट करून (फिरवून)भारत सरकारची फसवणूक केली म्हणून तरबेज मोमीन याच्या विरोधात एटीएस विभागातील उपनिरीक्षक वर्षाराणी आजले यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास एस.एम.घुगे हे करीत आहे.