कटक : फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे यजमान भारताला दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. हेन्रिच क्लासनच्या (४६ चेंडूंत ८१ धावा) दमदार खेळीच्या जोरावर आफ्रिकेने हा सामना चार गडी आणि १० चेंडू राखून जिंकला.
रविवारी कटक येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान आफ्रिकेने १८.२ षटकांत गाठले आणि पाच सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली. आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. भुवनेश्वर कुमारने रीझा हेन्ड्रिक्स (४), ड्वेन प्रिटोरियस (४) आणि रासी व्हॅन डर डसन (१) यांना झटपट बाद करत आफ्रिकेची ३ बाद २९ अशी स्थिती केली. मात्र, क्लासनने कर्णधार टेम्बा बव्हुमाच्या (३० चेंडूंत ३५) साथीने आफ्रिकेचा डाव सावरला. या दोघांनी ६४ धावांची भागीदारी रचली. बव्हुमाला यजुर्वेद्र चहलने माघारी पाठवल्यावर क्लासनला डेव्हिड मिलरची (१५ चेंडूंत नाबाद २०) साथ लाभली. क्लासनने ४६ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने ८१ धावांची खेळी केल्यावर त्याला हर्षल पटेलने बाद केले. मात्र, मिलरने एक बाजू लावून धरत आफ्रिकेचा विजय साकारला.
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १४८ अशी धावसंख्या उभारली. ऋतुराज गायकवाड (१) छाप पाडण्यात अपयशी ठरला. मग इशान किशन (२१ चेंडूंत ३४) आणि श्रेयस अय्यर (३५ चेंडूंत ४०) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ४५ धावांची भर घातली. मात्र, या दोघांनाही चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रुपांतरण करता आले नाही. तसेच मधल्या फळीतील कर्णधार ऋषभ पंत (५) आणि हार्दिक पंडय़ा (९) हे फलंदाजही लवकर बाद झाले. यानंतर मात्र अखेरच्या षटकांत अनुभवी दिनेश कार्तिकने (२१ चेंडूंत नाबाद ३०) षटकेबाजी करत भारताला दीडशे धावांसमीप नेले.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ६ बाद १४८ (श्रेयस अय्यर ४०, इशान किशन ३४, दिनेश कार्तिक नाबाद ३०; आनरिख नॉर्किए २/३६) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : १८.२ षटकांत ६ बाद १४९ (हेन्रिच क्लासन ८१, टेम्बा बव्हुमा ३५; भुवनेश्वर कुमार ४/१३)
’ सामनावीर : हेन्रिच क्लासन